महाराष्ट्रात ऑक्सिजन वाया जाऊ नये म्हणून नेमल्या जाणार ऑक्सिजन नर्स

महाराष्ट्रातील सर्व सरकारी हॉस्पिटल मध्ये ऑक्सिजन नर्सची नियुक्ती करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला असून त्या दृष्टीने काम सुरु झाल्याचे समजते. राज्यात करोनाची परिस्थिती भयावह आहे, रुग्णांना बेड मिळण्यात अडचणी येत आहेतच पण ऑक्सिजनची कमतरता फार मोठ्या प्रमाणावर जाणवत आहे. त्यामुळे उपलब्ध ऑक्सिजन वाया जाऊ न देणे यासाठी ही व्यवस्था केली जात आहे. गतवर्षी नंदुरबार येथील एका रुग्णालयात अशी सोय केली गेली होती आणि त्याचा फार मोठा उपयोग झाला होता. या वर्षीही या रुग्णालयाने ऑक्सिजन नर्स नेमल्या आहेत. त्यामुळे लवकरच हा प्रयोग राज्यभर केला जाणार असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.

आरोग्य सचिव अर्चना पाटील यांनी लवकरच सरकारतर्फे सर्व सरकारी वैद्यकीय महाविद्यालये व रुग्णालयाना ऑक्सिजन नर्स नेमण्याचे निर्देश जारी केले जात असल्याचे सांगितले आहे असे टाईम्स ऑफ इंडियाच्या बातमीत म्हटले गेले आहे.

या नर्स दर दोन ते चार तासांनी रुग्णाला ऑक्सिजनची किती गरज आहे हे चेक करतील आणि त्यानुसार ऑक्सिजनचे प्रमाण कमी जास्त करतील. ५० रुग्णांसाठी एक नर्स असेल. आरोग्य मंत्री राजेश टोपे म्हणाले, ऑक्सिजनचा विचारपूर्वक वापर करण्यावर भर देणे आवश्यक आहे. ऑक्सिजन वाया जाणार नाही याची काळजी घेतली जाणार आहे. अनेकदा पेशंट वॉशरूम मध्ये गेला असेल, जेवत असेल, फोनवर बोलत असेल तर तोंडावरचा ऑक्सिजन मास्क काढून ठेवतो पण त्यावेळी ऑक्सिजन पुरवठा सुरूच असल्याने तो वाया जातो. पेशंटच्या रक्तातील ऑक्सिजन पातळी सुधारली असेल तरी फ्लो कमी केला जात नाही. ही सर्व काळजी ऑक्सिजन नर्स घेतील.