जगातील सर्वाधिक वयोवृद्ध ‘शुटर दादी’ करोना संक्रमित

शुटर दादी नावाने प्रसिद्ध असलेल्या निशानेबाज चंद्रो तोमर यांना करोनाची लागण झाली असून त्यांना मेरठ येथील एका रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. उत्तर प्रदेशाच्या बागपत येथे राहणाऱ्या या आजीबाई जगातील सर्वात वयोवृद्ध निशानेबाज मानल्या जातात. त्यांचे वय ८९ वर्षाचे आहे. त्यांच्या ट्विटर पेज वरून त्यांना करोना संक्रमण झाल्याची माहिती त्यांच्या मुलाने दिली आहे.

ट्विटरवरील माहिती मध्ये म्हटले गेले आहे, दादी चंद्रो याना करोनाची लागण झाली असून श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने रुग्णालयात दाखल केले गेले आहे. ईश्वर सर्वांचे रक्षण करो. शुटर दादीच्या चाहत्यांनी त्यांना लवकर बऱ्या व्हा असे संदेश मोठ्या संखेने पाठविले आहेत.

शुटर दादीची कहाणी मोठी रोचक आणि प्रेरणादायी आहे. त्यांची नात शेफाली सुद्धा शुटर आहे. जोहाडी येथे शुटींग रेंज सुरु झाल्यावर शेफालीला पोहोचवायला त्या रेंज मध्ये जात असत आणि निशानेबाजी कशी करतात ते पाहत असत. एकादा त्यांनी सहज पिस्तोलने नेम साधला आणि पहिलाच शॉट १० वर लागला. त्यावेळी शुटर दादीने वयाची साठी ओलांडली होती. घराचा विरोध पत्करून त्यांनी गुपचूप हे कौशल्य प्राप्त केले आणि विविध राष्ट्रीय स्पर्धात ५० हून अधिक पदके मिळविली आहेत. त्यांच्या जीवनावर एक चित्रपट सुद्धा निर्माण झाला आहे.