अभिमानस्पद; महाराष्ट्राने पूर्ण केले दीड कोटी नागरिकांचे लसीकरण


मुंबई : आज महाराष्ट्राने कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणात मैलाचा दगड रोवत दीड कोटी नागरिकांचे लसीकरण पूर्ण केले आहे. याबद्दल आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आरोग्य यंत्रणनेचे अभिनंदन करतानाच दररोज 8 लाख लसीकरणाचे राज्याने उद्दिष्ट ठेवले असून त्याचा लसींचा पुरवठा वेळेवर व्हावा, अशी मागणी केंद्र सरकारकडे केल्याचे सांगितले.

सुमारे 12 कोटी डोसेसची राज्यातील 18 ते 44 वयोगटातील 5 कोटी 71 लाख नागरिकांच्या लसीकरणासाठी आवश्यकता आहे. त्यासाठी लसींची उपलब्धता हे आव्हानात्मक काम असल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले. राज्यात ऑक्सिजनच्या वापराबाबत प्रमाणीत कार्यपद्धती (एसओपी) निश्चित करण्यात आली असून त्यानुसार रुग्णांना ऑक्सिजन देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. त्याचबरोबर रुग्णालयांनी नंदूरबार पॅटर्ननुसार ऑक्सिजन नर्सची नेमणूक करावी, असेही आरोग्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

राज्य शासनाने ऑक्सिजन, रेमडीसीवीर उपलब्धतेसाठी जागतिक निविदा काढली आहे. त्याद्वारे 40 हजार ऑक्सिजन कॉनट्रॅक्टर, 132 पीएसए, 27 ऑक्सिजन टॅंक, 25 हजार मेट्रीक टन लिक्विड ऑक्सिजन आणि 10 लाख व्हायल्स रेमडीसीवीरच्या या साहित्यासाठी ही जागतिक निविदा काढली आहे.