छोटा राजनला करोना- एम्स मध्ये बेड मिळाला, डॉक्टर नाराज

अंडरवर्ल्ड डॉन राजेंद्र निकाळजे उर्फ छोटा राजन याला करोना झाल्यामुळे तिहार जेल मधून दिल्लीच्या एम्स रुग्णालयात दाखल केले गेले आहे. सोमवारी जेल अधिकाऱ्यांनी ही माहिती फोनवरून सत्र न्यायालयाच्या न्यायाधीशांना दिली. छोटा राजन व्हीडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून न्यायालयापुढे हजर होऊ शकत नाही त्याचे कारण देताना ही माहिती दिली गेली.

मात्र देशात सर्वसामान्य रुग्णांना ऑक्सिजन बेड तर सोडाच पण साधा बेड सुद्धा हॉस्पिटल मध्ये मिळत नसताना छोटा राजन याला एम्स मध्ये बेड मिळाला यावर अनेकांनी भुवया वर केल्या आहेतच पण डॉक्टरांनी सुद्धा आश्चर्य आणि नाराजी व्यक्त केली आहे.

६१ वर्षीय राजन २०१५ मध्ये इंडोनेशियाच्या बाली येथून प्रत्यार्पण करून भारतात आणला गेला तेव्हापासून त्याला अटक करून तिहार जेल मध्ये ठेवले गेले आहे. त्याच्या विरुद्धच्या मुंबई पोलिसांनी नोंदविलेल्या सर्व केसेस सीबीआय कडे सोपविल्या गेल्या आहेत. या केसेस चालविण्यासाठी विशेष न्यायालयाची स्थापना केली गेली आहे. राजन मध्ये करोनाची लक्षणे दिसल्यावर त्याची टेस्ट केली गेली ती पोझिटिव्ह आली होती. त्याच्या सुरक्षेसाठी असलेल्या सर्व कर्मचाऱ्यांच्या चाचण्या केल्या जात असून त्यांना विलीगीकरणात ठेवले गेले असल्याचे सहाय्यक जेलरनी सांगितले आहे.