आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशनवर अंतराळवीरांचे गळाभेटीने स्वागत

एलोन मस्क यांच्या क्रू ड्रॅगन स्पेस क्राफ्ट मधून चार अंतराळवीर आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशनवर सुखरूप पोहोचले असून तेथे अगोदरच उपस्थित असलेल्या बाकी अंतराळवीरांनी गळाभेट घेऊन या नव्या अंतराळवीरांचे स्वागत केले आहे. या स्टेशनवर अगोदर सात अंतराळवीर आहेतच. त्यामुळे आता स्टेशन वरील अंतराळ वीरांची संख्या ११ झाली आहे. स्वागत गळाभेटीचा व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल झाला असून नासाने त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवर तो शेअर केला आहे.

नासाने या व्हिडीओच्या कॅप्शन मध्ये ‘ क्रू दोनचे स्पेस स्टेशनवर स्वागत’ असे म्हटले आहे. या चारी अंतराळवीरांना उड्डाणापूर्वी २ ते ३ आठवडे विलगीकरणात ठेवले गेले होते. फारच मर्यादित लोकांना या काळात ते भेटू शकले होते. स्पेस मधून परत आलेल्यांना सुद्धा बाहेरच्या जगातील विषाणूंचा संसर्ग पृथ्वीवर होऊ नये म्हणून असेच क्वारंटाइन केले जाते. सोशल मीडियावर मात्र युजर्सनी अंतराळात करोना नाही काय, तेथे सोशल डीस्टन्सिंग आवश्यक नाही काय असे मजेदार प्रश्न विचारले आहेत.