अमेरिकेहून भारतासाठी पाच टन ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर रवाना


वॉशिंग्टन: भारतातील कोरोनाबाधितांची संख्येत सातत्याने वाढ होत असल्यामुळे तेथील आरोग्य व्यवस्था कोलमडल्याचे चित्र आहे. भारतात सुरू असलेल्या कोरोना महामारीच्या थैमानाची दखल जगभरातील इतर देशांनी घेतली असून भारताकडे मदतीचा हात पुढे केला आहे. भारतातील ऑक्सिजनचा तुटवडा लक्षात घेता अमेरिकेने ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर पाठवले आहेत. अमेरिकेतील भारतीय अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, न्यूयॉर्कहून रविवारी सकाळी भारतासाठी ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर पाठवण्यात आले आहेत.

भारतासाठी कॅनेडी आंतरराष्ट्रीय विमानतळावरून पाच टन ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर रवाना करण्यात आले आहेत. सोमवारी दुपारी दिल्लीत हा ऑक्सिजन दाखल झाला. ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरच्या माध्यमातून हवेतील ऑक्सिजन रुग्णांना देता येऊ शकतो.

भारतात मागील २४ तासामध्ये तीन लाखांहून अधिक कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली. कोरोनाबाधितांची संख्या वाढत असताना गंभीर रुग्णांचीही संख्या वाढण्याचा धोका व्यक्त केला जात आहे. अमेरिकेसह इतर देशांकडूनही भारताला मदत पाठवण्यात येत आहे.

दोन दिवसांत एअर इंडियाच्या विमानातून ६०० ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर भारतात दाखल होणार आहेत. उड्डयन मंत्रालयाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, खासगी संस्था, कंपन्यांनी हे ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर अमेरिकन कंपन्यांकडून खरेदी केले आहेत. येत्या काही आठवड्यात एअर इंडियाच्या विमानातून खासगी संस्थांसाठी १० हजार ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर भारतासाठी दाखल होतील.

दरम्यान भारताच्या मदतीसाठी पाकिस्तानही पुढे सरसावला आहे. व्हेंटिलेटरसह इतर आवश्यक उपकरणे पाठवण्याची तयारी केली आहे. याबाबतची माहिती पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने दिली आहे. पाकिस्तानमध्ये दोन दिवसांपूर्वीच भारताच्या मदतीसाठी सोशल मीडियावर मोहीम सुरू झाली होती.