कोरोनामुळे जेठालालचे नट्टू काका झाले बेरोजगार


कोरोनामुळे पुन्हा एकदा देशातील अनेक राज्यांमधील उद्योगधंदे बंद पडले आहेत. कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत असल्यामुळे अनेक कार्यालयांमधील कर्मचाऱ्यांची कपात त्याचबरोबर जे कर्मचारी काम करत आहेत त्यांनादेखील कमी पगार दिला जात आहे. कोरोना महामारीचा फटका मनोरंजन क्षेत्रालादेखील बसला आहे.

महाराष्ट्रात सुरू झालेल्या लॉकडाऊनमुळे अनेक मालिकांचे चित्रीकरण बंद करण्यात आल्यामुळे अनेक छोटे कलाकार बेरोजगारीच्या उंबरठ्यावर उभे आहेत. टीव्हीवरील लोकप्रिय मालिका ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ मधील नट्टू काका देखील सध्या बेरोजगारीचे शिकार झाले आहेत.

अनेकांनी २०२० साली सुरू झालेल्या लॉकडाऊनमध्ये बेरोजगारीमुळे आत्महत्या केली होती. तिच परिस्थिती आता पुन्हा दिसू लागली आहे. तारक मेहता का उल्टा चष्मा मालिकेत नट्टू काकांची भूमिका साकारणारे अभिनेते घनश्याम नायक यांनी एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत त्यांची आर्थिक स्थितीबद्दल सांगितली आहे.

त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मागील काही महिन्यापासून ते घरीच आहेत. त्यांना हेदेखील माहीत नाही की, पुन्हा चित्रीकरणासाठी कधी बोलावले जाईल किंवा मालिकेत त्यांचे पात्र पुन्हा कधी दाखवले जाईल. आता कोरोनामुळे मालिकेचे चित्रीकरण पूर्णपणे बंद करण्यात आले आहे. घनश्याम यांनी सांगितल्यानुसार, मार्च महिन्यात मी शेवटचे चित्रीकरण केले होते. त्यानंतर मी घरीच आहे. निर्मात्यांनी चित्रीकरणाची जागा बदलण्याचादेखील कोणताही विचार केलेला नाही.

त्याचबरोबर मालिकेचे निर्माते असित मोदी आणि गोलीची भूमिका साकारणारा अभिनेता कुश शाह यांच्यासह अनेक कलाकार काही दिवसांपूर्वी कोरोनाबाधित झाले होते. घनश्याम यांचे वय जास्त असल्यामुळे त्यांचे घरचेदेखील चिंतेत असतात. परंतु, त्यांना सेटवर पुन्हा जाण्याची इच्छा आहे. मालिकेचा सेट मुंबईत असल्यामुळे मालिकेचे चित्रीकरण सध्या बंद ठेवण्यात आले आहे.