बच्चू कडूंच्या पक्षाने केली नवाब मलिकांना पालकमंत्री पदावरून हटवण्याची मागणी


परभणी – राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष शिवलिंग बोधने यांनी परभणी जिल्ह्याचे पालकमंत्री पदावरुन नवाब मलिकांना हटवण्यात यावे अशी मागणी केली आहे. बोधने यांनी याबाबत थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र पाठवले आहे. पूर्णवेळ कार्यक्षम पालकमंत्री परभणी जिल्ह्याला द्यावा अशी मागणी शिवलिंग बोधने यांनी पत्रात केली आहे.

शिवलिंग बोधने म्हणाले की, राज्य सरकारमधील नवाब मलिक हे मोठे मंत्री आहेत. त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षाचीही मोठी जबाबदारी मलिकांवर आहे. गेल्यावर्षीही कोरोनाकाळात नवाब मलिक यांना परभणीकडे लक्ष देण्यास वेळ नव्हता. ते कधी जिल्ह्यात आले तर फक्त २ तासात आढावा घेऊन परत जातात. परभणीत कोरोनाबाधितांची वाढत आहे. पालकमंत्री नवाब मलिकांना जिल्ह्याकडे लक्ष देण्यास वेळ नाही. आम्ही ही मागणी परभणीतील जनतेच्या हितासाठी केल्याचे त्यांनी सांगितले.

तसेच अडचणीच्या काळात प्रत्येक जण गावोगावी जाऊन मदत करत आहोत, पालकमंत्र्यानी परभणीत यावे, येथे थांबावे प्रशासनाला योग्य सूचना द्याव्यात अशी अपेक्षा आहे. पालक म्हणजे पालकाप्रमाणे जिल्ह्याची काळजी घ्यावी. आम्ही राजकारण करण्यासाठी नव्हे तर समाजकारणासाठी आम्ही ही मागणी करत आहोत. परभणी जिल्ह्याचे ऑक्सिजन सिलेंडर इतर जिल्हे पळवत आहेत, पण पालकमंत्र्यांचे लक्ष नसल्याचा दावाही शिवलिंग बोधने यांनी पत्रातून केला आहे.