ठाण्यात ऑक्सिजन तुटवड्यामुळे ४ कोरोनाबाधितांचा मृत्यू !


ठाणेः ठाण्यातील वर्तकनगर येथील वेदांत रुग्णालयातील चार कोरोनाबाधितांचा मृत्यू झाल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. या रुग्णांचा मृत्यू ऑक्सिजन अभावी झाल्याचा आरोप मृतांच्या नातेवाईकांनी केला आहे. पण, हे आरोप रुग्णालय प्रशासनाने फेटाळून लावले आहेत.

या रुग्णांचा मृत्यू ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे झाल्याचा आरोप रुग्णांच्या नातेवाईकांनी केला आहे. रुग्णालयासमोर रुग्णांच्या नातेवाईकांनी आक्रोश केल्यानंतर मनसे आणि भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.

दरम्यान राज्याचे गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी या प्रकरणी रुग्णालयास भेट देऊन प्रकरणाची चौकशी करण्यासाठी भिवंडीचे आयुक्त डॉ. पंकज अशिया यांच्या अध्यक्षतेखाली सहा जणांच्या समितीची नियुक्ती केली आहे. या समितीकडून या प्रकरणाची चौकशी करून प्रकरणाचा सविस्तर अहवाल आल्यानंतर दोषींवर कारवाई करण्यात येईल, असे जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्ट केले.

या रुग्णांचा मृत्यू ऑक्सिजन संपल्यामुळेच झाल्याचा थेट आरोप मनसेकडून करण्यात आला आहे. ऑक्सिजन संपत आल्यानंतरही रुग्णालय प्रशासनाकडून तजवीज करण्यात आली नसल्यामुळे रुग्णांचे नातेवाईक संतप्त झाले होते. रुग्णालय परिसरातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर पोलीसांकडून बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.