आर अश्विनचा कुटुंबासाठी आयपीएल मधून ब्रेक

रविवारी दिल्ली कॅपिटलचा स्टार ऑफ स्पिनर रविचंद्रन अश्विन व राजस्थान रॉयल्स चा  फास्ट गोलंदाज अँड्र्यू टाई यांनी आयपीएल स्पर्धेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी राजस्थान रॉयल चा लीवम् लिविंगस्टोन यानेही बायो बबल मध्ये थकवा जाणवत असल्याचे कारण देऊन इंग्लंडला प्रयाण केले होते. देशात करोनाचे थैमान सुरु असून रोज तीन लाखाहून नवे रुग्ण आढळून येत आहेत मात्र आयपीएल १४ च्या स्पर्धा या परिस्थितीत सुद्धा सुरु आहेत. मात्र खेळाडूंना आता खेळापेक्षा घराची ओढ आणि काळजी अधिक वाटत असल्याचे अनुभवास येत आहे.

दिल्लीने हैद्राबाद विरुद्ध सुपर ओव्हर मध्ये विजय मिळविल्यावर अश्विनने सोशल मीडियावर मेसेज टाकला आहे. त्यात त्याच्या परिवाराला करोनाची लागण झाली असल्याचे आणि या वेळी त्यांच्यासोबत राहण्याची गरज असल्याचे त्याने नमूद केले आहे. त्यामुळे आयपीएल मधून ब्रेक घेत असल्याचे आणि कुटुंबाची परिस्थिती सुधारली तर पुन्हा स्पर्धेत येईल असेही त्याने नमूद केले आहे.

याबरोबरच ऑस्ट्रेलियाच्या दोन अन्य खेळाडूंनी त्यांच्या संघाना घरी परतण्याची इच्छा असल्याचे सूचित केले असल्याचेही समजते. या दोन खेळाडूंची नावे जाहीर केली गेलेली नाहीत. दिल्ली कॅपिटल्सचा टीम कोच रिकी पॉंटिंग यानेही खेळाडू मैदानापेक्षा बाहेर काय काय घडत आहे याचीच जास्त चर्चा करत असल्याचे सांगितले आहे.