असा असतो केन्सिंग्टन पॅलेस येथे ‘हाय टी’ समारंभ


ब्रिटीश शाही घराण्यातील सदस्यांच्या औपचारिक भेटी घेण्यासाठी अनेक देश-विदेशी पाहुणे मंडळी नेहमीच येत असतात. अशा पाहुण्यांसाठी खास ‘हाय टी’ म्हणजेच चहापानाचा छोटासा समारंभ नेहमीच आयोजित केला जात असतो. केन्सिंग्टन पॅलेस हे प्रिन्स विलियम आणि त्याची पत्नी केट मिडलटन यांचे औपचारिक निवासस्थान असून त्यांना भेटण्यास येणाऱ्या पाहुण्यांसाठीही हा चहापानाचा कार्यक्रम नित्यनेमाने आयोजित होत असतो. मात्र हा चहापानाचा कार्यक्रम शाही सदस्यांच्या उपस्थितीमध्ये होणारा असून, याच कारणास्तव या समारंभाला उपस्थित राहणाऱ्या पाहुणे मंडळींसाठी काही नियमांचे पालन करणे बंधनकारक असते.

या चहापानाच्या समारंभाला सर्वसाधारण औपचारिक भाषेमध्ये ‘हाय टी’ म्हटले जात असले, तरी शाही राजवाड्यांमध्ये मात्र हा समारंभ दुपारच्या वेळी आयोजित होत असल्यास या समारंभाचा उल्लेख ‘आफ्टरनून टी’ असा केला जातो. राणी एलिझाबेथ या समारंभाचा उल्लेख केवळ ‘टी’ म्हणूनच करते. या चहापानाच्या समारंभाचे आयोजन दुपारी तीन ते सायंकाळी पाचच्या दरम्यान केले जात असून, चहा सोबत निरनिराळी सँडविचेस, बिस्किटे, ‘स्कोन्स’, आणि तऱ्हे-तऱ्हेची मिष्टान्ने सर्व्ह केली जातात. या चहापानाच्या समारंभामध्ये मांसाहारी पदार्थ शक्यतो सर्व्ह केले जात नाहीत. ‘हाय टी’चा समारंभ सायंकाळी पाचच्या नंतर आयोजित केला जातो. या समारंभामध्ये चहासोबत पोटभरीचे खाद्यपदार्थ सर्व्ह केले जात असून, यांमध्ये मांसाहारी पदार्थांचाही समावेश असतो.

या चहापानाच्या दरम्यान जर पाहुण्यांच्या समोरील टेबलवर चहाची कप-बशी ठेवली असेल, तर केवळ कप हातामध्ये उचलून बशी टेबलवरच ठेवण्याची पद्धत असते. जर टेबल उपलब्ध नसले तर मात्र पाहुण्यांना कप आणि बशी दोन्ही उचलून हातामध्ये धरावे लागते. चहाचा कप हाती धरताना तो कशा प्रकारे धरला जावा, याचे ही निश्चित नियम आहेत. चहाचा कप धरताना दोन्ही हातांमध्ये धरला जाऊ नये, कपाचा कान हातामध्ये धरताना तर्जनी आणि अंगठा यांच्या चिमटीमध्ये कपाचा कान धरून मधल्या बोटाने कपाच्या कानाला आधार दिला जावा. कप धरताना हाताची करंगळी आणि अनामिका आतल्या बाजूला वळलेली असावी.

कप बशी हातामध्ये धरलेली असताना कपाचा कान नेहमी आपल्याला समांतर आडवा असा असावा. तसेच चहा तील साखर कपमध्ये ढवळताना चमचा संपूर्ण गोलाकार न फिरविता अर्धगोलाकार फिरवावा. कपमध्ये आधी वाफाळता कोरा चहा घालून त्यानंतर त्यामध्ये थोडेसे थंड दुध घालून चहा पिण्याची पद्धत येथे सर्वमान्य आहे. चहा किटलीतून ओतला जात असताना एक लहानसे गाळणे कप वर ठेऊन मग चहा कपमध्ये ओतला जातो. औपचारिक चहापानाच्या वेळी आणि इतर वेळीही टी बॅग्जचा वापर सर्वथा वर्ज्य आहे. चहापानाच्या सोबत असलेले पदार्थ खाताना ते कसे खाल्ले जावेत याचेही काही नियम आहेत. सर्वात आधी सँडविच, त्यानंतर ‘स्कोन्स’, आणि सर्वात शेवटी मिष्टान्ने अशा क्रमवारीमध्ये पदार्थ खाल्ले जाणे अपेक्षित असते. ‘स्कोन’ हा खाद्यपदार्थ कुकी प्रमाणे असून, हा सामान्यपणे जॅम बरोबर खाल्ला जातो. हा पदार्थ खाताना हा बोटांनी दोन भागांमध्ये तोडून घेऊन त्यामध्ये आधी क्रीम आणि मग जॅम लावून खाल्ला जातो. मिष्टान्ने मात्र सर्वात शेवटी खाल्ली जातात.

Leave a Comment