18 वर्षावरील व्यक्तींनी कोरोना लसीकरणासाठी ऑनलाईन रजिस्ट्रेशन करावे; केंद्र सरकार


नवी दिल्ली : 18 वर्षावरील सर्वांना येत्या 1 मे पासून कोरोनाची लस देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. त्याचाच एक भाग म्हणून 28 एप्रिलपासून या 18 ते 45 वर्षावरील सर्वांना आपल्या नावाची नोंद करता येणार आहे. लस कोरोना लसीकरणाच्या केंद्रावर थेट जाऊन मिळणार नाही. त्यामुळे या वयोगटातील लोकांनी आपल्या नावाची नोंद ऑनलाईन पद्धतीने करावी असे आवाहन केंद्र सरकारने केंल आहे. केंद्र सरकारच्या कोविन अॅप आणि cowin.gov.in या वेबसाईटवर लसीसाठी नोंद करता येणार आहे.

ऑनलाईन रजिस्ट्रेशन केल्यामुळे लसीचे नियोजन करायला मदत मिळेल, तसेच लसीकरण केंद्रावरची गर्दी कमी होण्यास मदत होईल, असेही सांगण्यात येत आहे. भारतात आतापर्यंत 14 कोटी लोकांना कोरोनाचा डोस देण्यात आला आहे. आतापर्यंत केवळ 11.6 टक्के लोकांनीच कोरोनाच्या पहिल्या डोससाठी ऑनलाईन पद्धतीने नोंदणी केली आहे. केंद्र सरकारनेही राज्य सरकारांना ऑनलाईन पद्धतीने जास्तीत जास्त रजिस्ट्रेशन करावे, अशा सूचना दिल्या आहेत.

देशात कोरोना लसीकरणाचा तिसरा टप्पा 1 मे पासून सुरु होणार असून त्यामध्ये 18 वर्षावरील सर्वांना कोरोनाची लस देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचारी, फ्रन्टलाईन वर्कर्स आणि 60 वर्षांवरील नागरिकांचा समावेश होता. तर दुसऱ्या टप्यात 45 वर्षांवरील सर्वांच लसीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्याचबरोबर आता राज्यांना थेट कंपन्यांकडून कोरोनाची लस खरेदी करण्याची मूभा केंद्र सरकारने दिल्यामुळे आपल्या गरजेनुसार आता राज्य सरकार खुल्या बाजारातून लस खरेदी करू शकतात.

दूसरीकडे येत्या एक मेपासून महाराष्ट्रात व्यापक लसीकरणाचा कार्यक्रम सुरू करण्यात येत असून त्यामध्ये जवळपास 8.5 कोटी लोकांचे लसीकरण करण्यात येणार आहे. तसेच राज्यातील लसीकरणाचा कार्यक्रम अधिक व्यापक करण्यासाठी राज्य सरकार आता परदेशातून कोरोनाच्या लसी आयात करणार आहे. तसेच ब्रिटनच्या धर्तीवर राज्यातील सर्व खात्यांचा फंड आता कोरोनाच्या लसीकरणाच्या कार्यक्रमासाठी वापरण्यात येईल, असा महत्वपूर्ण निर्णय राज्यातील महाविकास आघाडी सरकारने घेतला आहे.