तापसी पन्नूचा ‘She-Man’ असा उल्लेख करणाऱ्या कंगनावर नेटकऱ्यांकडून टीकेची झोड


आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे अभिनेत्री कंगना राणावत नेहमीच चर्चेत असते. आता तिची जीभ अभिनेत्री तापसी पन्नूबद्दल बोलताना घसरली असून तापसी ही ‘She-Man’ असल्याचे तिने सांगितले आहे. सोशल मीडियात तिच्या या वक्तव्यावर टीकेची झोड उडाल्यानंतर तिने आपली बाजू सावरण्याचा प्रयत्न केला.

ट्विटरवरील एका ट्वीटमध्ये अभिनेत्री कंगना राणावतची अभिनेत्री तापसी पन्नू ही स्वस्त कॉपी असल्याचे म्हटले होते. त्यावरुन तिच्यावर टीका देखील करण्यात आली होती. कंगनाची जीभ त्या ट्वीटला रिप्लाय देताना घसरली. कंगना म्हणाली की, आज She-Man खूप खुश असेल, त्यावर कंगनाने स्माईली इमोजीही टाकली होती.


आता कंगनाच्या या ट्वीटनंतर तिच्यावर टिकेची झोड उडाली आहे. तिच्याकडून असल्या ट्वीटची अपेक्षा नसल्याचे अनेकांनी सांगितले. आपल्या या ट्वीटवर नेटकऱ्यांकडून होणारा विरोध लक्षात घेता कंगनाने सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. आणखी एका ट्वीटच्या माध्यमातून कंगना म्हणाली की, She-Man असणे काही चुकीचे आहे का? मला वाटते की तापसीच्या मजबूत लूकची ही स्तुती आहे, तुम्ही नकारात्मक का विचार करत आहात, हे मला समजत नाही.


आपल्या वक्तव्याबद्दल कंगनाने माफी मागितली तर नाहीच पण तिच्यावर टीका करणाऱ्यांनाच उलट तिने आपण कसे बरोबर आहोत आणि आपल्या वक्तव्याचा कसा चुकीचा अर्थ लावला गेला हे सांगण्याचा प्रयत्न केला.