गोव्यातील ही ठिकाणे आहेत झपाटलेली


प्रत्येक ठिकाणचा स्वतःचा असा एक इतिहास असतो. अनेक ऐतिहासिक, प्राचीन कालीन मंदिरे, उद्याने, संग्रहालये, इमारती, इतर प्रेक्षणीय स्थळे यांसोबतच हौशी मंडळींना आकर्षण असते, ते त्या ठिकाणी असलेल्या तथाकथित ‘झपाटलेल्या’ वास्तूंचे. अशा ‘झपाटलेल्या’ वास्तू भारतामध्ये अनेक ठिकाणी अस्तित्वात आहेत. गोवा हे खरे तर भारतातील सर्वात लोकप्रिय पर्यटनस्थळांपैकी एक. सुंदर सागरी किनारे, दोन्ही बाजूंना टुमदार घरे असलेले वळणा-वळणांचे रस्ते, प्राचीन चर्चेस आणि सुप्रसिद्ध ‘फेनी’ या खासियती असलेल्या गोव्यामध्येही काही ठिकाणे ‘झपाटलेली’ आहेत असे म्हटले जाते.

खरे तर नकारात्मक शक्तीपासून बचाव करण्यासाठी प्रार्थनास्थळ हे सर्वात सुरक्षित ठिकाण समजले जाते, पण गोव्यातील एक चर्च झपाटलेले असल्याच्या कथा येथे प्रसिद्ध आहेत. या चर्चला ‘किंग्ज चर्च’ नावाने ओळखले जाते. या चर्चशी निगडीत आख्यायिका अशी, की या ठिकाणी एका राजाने, त्याचे शत्रू असलेल्या दोन राजांची हत्या, त्यांचे राज्य बळकाविण्याच्या उद्देशाने, या ठिकाणी केली. त्यानंतर राजाला उपरती झाली, आणि आपल्या पापाचा पस्तावा होऊन त्याने ही याच ठिकाणी विषप्राशन करून आत्महत्या केली. आता या तीनही राजांचे आत्मे या चर्चमध्ये वास्तव्य करून असल्याची आख्यायिका आहे. येथे आलेल्या अनेक स्थानिक मंडळींनी आणि पर्यटकांनी देखील येथे वेळोवेळी अनेक चित्रविचित्र आवाज ऐकले आहेत. तसेच येथे कोणाचे तरी अस्तित्व असल्याचा भासही झाल्याचे अनेक अनुभव लोकांनी कथन केले आहेत. वास्तविक या चर्चच्या परिसरामधून सायंकाळी सूर्यास्ताचे अतिशय मनोरम दर्शन होत असते. मात्र या चर्चशी निगडीत अनेक कथा सर्वश्रुत असल्याने येथे येणारे लोक संध्याकाळच्या आत येथून निघून जाणेच पसंत करतात.

इगोर्चेम बीच हे असे ठिकाण आहे, जिथे तुम्हाला चित्रविचित्र अनुभव येण्यासाठी अंधार होण्याची वाट पहावी लागणार नाही. या ठिकाणी अगदी दिवसाउजेडी देखील भुताटकीचे प्रकार घडत असल्याचे म्हटले जाते. या ठिकाणाला इगोर्चेम बांध या नावाने ओळखले जात असून, राया गावाच्या नजीक हा बांध आहे. दुपारी दोन ते तीनच्या दरम्यान या परिसरातून जो कोणी जात-येत असेल, त्याला ‘भूतबाधा’ होत असल्याची स्थानिक लोकांची समजूत आहे. किंबहुना येथे भरदिवसा आलेल्या अनेक मंडळींना चित्रविचित्र अनुभव आले असल्याच्या अनेक कथा येथे सर्वश्रुत आहेत. नवेलिम आणि द्रामपूर या गावांना जोडणाऱ्या जकनी बांधाचा परिसरही झपाटलेला आहे असे म्हटले जाते. याचा संबंध खरेतर एका दुर्दैवी घटनेशी आहे. काही वर्षांपूर्वी, लहान शाळकरी मुलांना घेऊन जाणारी एक बस या बांधावरून उलटून झालेल्या भीषण अपघातामध्ये सर्व मुले, आणि बसचा चालक दगावले होते. याच मुलांच्या रडण्याचे, वेदानेपायी कळवळण्याचे आवाज आजही सूर्यास्तानंतर येथे ऐकू येत असल्याचे म्हटले जाते.

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग १७ या रस्त्यावर एका विवक्षित ठिकाणी अनेक विचित्र अनुभव आल्याच्या कथा ऐकावयास मिळतात. या ठिकाणी मांसाहारी पदार्थांच्या शोधामध्ये अनेक ‘भुते’ भटकत असल्याच्या आख्यायिका सर्वश्रुत आहेत. त्यामुळे त्या ठिकाणी जाताना कोणीही सोबत मांसाहारी पदार्थ नेऊ नयेत असा अलिखित नियम येथे आहे. किंबहुना सोबत मांसाहारी पदार्थ घेऊन प्रवास करीत असताना गाडीवरील ताबा अचानक सुटल्याचे अनुभव आजवर अनेक प्रवाश्यांना येथे आले असल्याचे स्थानिक गावकरी सांगतात. धावली आणि बोरी या गावांच्या मध्ये असलेल्या बायताखोल या ठिकाणाहून रात्रीच्या वेळी प्रवास करणाऱ्यांना अनेक भीतीदायक अनुभव आल्याचे म्हटले जाते.

Leave a Comment