भारत बायोटेकनेही जाहिर केली कोव्हॅक्सिनची किंमत


नवी दिल्ली : संपूर्ण स्वदेशी लस कोव्हॅक्सिन या कोरोना प्रतिबंधक लसीच्या प्रति डोसच्या किमतीची घोषणा भारत बायोटेकने केली आहे. कंपनीने सांगितले की, 600 रुपये राज्य सरकारसाठी प्रति डोस आणि खाजगी रुग्णालयांसाठी 1,200 रुपये प्रति डोस दराने देण्यात येणार आहे. भारत बायोटेकने सांगितले की, केंद्र सरकारच्या निर्देशांनुसार, आम्ही कोव्हॅक्सिन लसीच्या डोसच्या किमतींची घोषणा केली आहे.

तत्पूर्वी बुधवारी सीरम इंस्टिट्यूट ऑफ इंडियाने सांगितले होते की, कोरोना प्रतिबंधक लस ‘कोव्हिशिल्ड’ची किंमत राज्य सरकारसाठी 400 रुपये प्रति डोस आणि खासजी रुग्णालयांसाठी 600 रुपये प्रति डोस असणार आहे.

कंपनीच्या मुख्य अधिकाऱ्यांनी सांगितले होते की, सध्याचा 150 रुपये प्रति डोसचा करार संपल्यानंतर केंद्र सरकारसाठीही लसीच्या प्रति डोसची किंमत 400 रुपये असणार आहे. सीरमने आपल्या निवेदनात सांगितले आहे की, केंद्र सरकारच्या लसीकरणाच्या कार्यक्रमासाठी 50 टक्के आणि उरलेला 50 टक्के राज्य सरकार आणि खाजगी रुग्णालयांसाठी देण्यात येणार आहे.

कंपनीच्या अधिकाऱ्यांनी पुढे बोलताना सांगितले की, सरकारच्या निर्देशांनुसार ‘कोव्हिशिल्ड’ची किंमत राज्य सरकारसाठी 400 रुपये प्रति डोस आणि खाजगी रुग्णालयांसाठी 600 रुपये प्रति डोस असणार आहे.

दरम्यान, या किमतीवरुन विरोधी पक्षांनी केंद्र सरकारवर टीकेची झोड उठवली होती. त्यांचे म्हणणे होते की, केंद्र सरकारला जर लसीचे डोस 150 रुपयांना उपलब्ध करुन दिले जात आहेत, तर राज्य सरकारला अधिक किंमतीत का देण्यात येणार?

दरम्यान सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने कोविड 19 प्रतिबंधक लस कोव्हिशिल्डच्या किंमतीबाबत स्पष्टीकरण दिले आहे. आगाऊ निधी मिळाल्यामुळे सुरुवातीला या लसीची किंमत जागतिक पातळीवर कमी होती, परंतु आता लस उत्पादन वाढवण्यात गुंतवणुकीची आवश्यकता असल्याचे स्पष्टीकरण सीरमने दिले आहे.