देशात कोरोनामुक्त होणाऱ्यांचा आकडा वाढला


नवी दिल्ली : देशावर ओढावलेल्या कोरोना संकटामुळे चिंतेत वाढ होत असतानाच एक दिलासादायक बाब समोर आली आहे. ती म्हणजे देशात कोरोनामुक्त होणाऱ्यांचा आकडा वाढत आहे. दरम्यान दररोज तीन लाखांहून अधिक नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद होताना दिसत आहे, त्याचबरोबर कोरोनामुळे प्राण गमावलेल्यांचा आकडा दिवसागणिक वाढताना दिसत आहे. आहे.

आरोग्य मंत्रालयाने नुकत्याच जारी केलेल्या आकडेवारीनुसार, काल दिवसभरात 3,49,691 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर 2767 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. दरम्यान, 2,17,113 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

दरम्यान, देशात मागील चार दिवसांत 1.3 मिलियनहून अधिक नव्या रुग्णांची नोंद झाली होती. 21 एप्रिलपासून 24 एप्रिलपर्यंत क्रमश: 3.14 लाख, 3.32 लाख, 3.46 लाख, 3.49 लाख रुग्णांची नोंद झाली आहे. हा आकडा जगभरातील इतर देशांच्या तुलनेत सर्वाधिक आहे.

महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांच्या वाढीचा चढता आलेख कायम आहे. काल 67 हजार 160 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली आहे. तर काल 63 हजार 818 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत एकूण 34 लाख 68 हजार 610 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 82.02 टक्के झाले आहे. राज्यात काल 676 कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर 1.51 टक्के आहे.

गेल्या 24 तासात मुंबईत 5867 कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. आतापर्यंत बरे झालेल्या एकूण रुग्णांची संख्या 5 लाख 29 हजार 817 वर पोहोचली आहे. सध्या 78 हजार 226 एकूण सक्रिय रुग्ण आहेत.