मेहंदीमुळे लहाणगीच्या हातावर केमिकल अॅलर्जी


हातांवर मेहंदी लावण्याची परंपरा केवळ भारतामध्येच नाही, तर जगातील बहुतेक इस्लामपंथीय देशांमध्येही रूढ आहे. भारतामध्येही स्त्रियांच्या हातांवर काढली गेलेली रेखीव, सुंदर रंगलेली मेहंदी ही स्त्रियांच्या सोळा शृंगारांपैकी एक समजली गेली आहे. पूर्वीच्या काळी मेहंदीच्या झाडांवरून मेहंदीच्या ताजी पाने तोडून आणून, ती वाटून मेहंदीची पेस्ट हातांवर लावली जात असे. त्याचप्रमाणे मेहंदीची पाने वाळवून, त्याची बारीक पूड करून मग ही मेहंदी पाण्यामध्ये कालवली जाऊन हातांना किंवा केसांना लावली जात असे. हातांवरील मेहंदी रंगण्यासाठी त्यामध्ये निलगिरीचे तेल, किंवा कोरा चहा घातला जात असे. तसेच मेहंदी रंगावी यासाठी तव्यावर लवंगा टाकून त्याच्या धुराने मेहंदी लावलेल्या हातांवर शेक घेतला जात असे. मेहंदी उत्तम रंगावी यासाठी त्यामध्ये केवळ घरगुती वस्तू घातल्या जात असत.

अलीकडच्या काळामध्ये मात्र मेहंदीचे तयार कोन बाजारामध्ये उपलब्ध असतात. यामध्ये असणारी ओली मेहंदी लवकर आणि जास्त रंगावी याकरिता निरनिराळी रसायने यांमध्ये मिसळली जात असतात. बाजारामध्ये तयार मिळणाऱ्या मेहंदी पावडरमध्येही अश्या प्रकारची रसायने आढळून येत असतात. या रसायनांच्या मुळे मेहंदीचा रंग लवकर गडद होत असला, तरी त्यामुळे त्वचेला अपाय होण्याची शक्यता ही असते. अशीच घटना एका लहान ब्रिटीश मुलीच्या बाबतीत घडली आहे. मॅडीसन गलिव्हर ही सात वर्षीय लहानगी सुट्टीच्या काळादरम्यान पर्यटनाच्या निमित्ताने आपल्या आईवडिलांसोबत इजिप्तला गेलेली असताना तिथे अनेक सार्वजनिक ठिकाणाला भेट देताना अनेक स्त्रियांच्या हातांवर सुंदर मेहंदी असल्याचे मॅडीसनने पाहिले होते. त्यामुळे ती रहात असलेल्या हॉटेलच्या स्पामध्ये मेहंदी काढणाऱ्या एका मनुष्याकडून मॅडीसनने मोठ्या हौशीने एका हातावर मेहंदी काढून घेतली.

मॅडीसनच्या हातांवरील मेहंदी सुंदर रंगली खरी, पण त्यानंतर मात्र जे घडले, त्याची कल्पना कोणीच केली नव्हती. मॅडीसनच्या हातावर काढलेली मेहंदी रसायनमिश्रित असल्याने या मेहंदीची तीव्र अॅलर्जी तिच्या हातावर आली. जिथे जिथे मेहंदी काढली गेली होती, तिथे तिथे भाजल्या प्रमाणे मोठमोठे फोड आले आणि हाताच्या बोटांपासून कोपरापर्यंत मॅडीसनच्या हातामध्ये भयंकर वेदनाही सुरु झाली. मॅडीसनच्या आईवडिलांकडे या बाबत हॉटेलमधील स्पा व्यवस्थापानाला घडलेला प्रकार सांगितल्यानंतर स्पा कर्मचाऱ्यांनी या संबंधी कोणतीही जबाबदारी स्वीकारण्यास स्पष्ट नकार देऊन, आजवर मेहंदीमुळे कधीही कोणाला अशी अॅलर्जी आली नसून, मॅडीसनच्या त्वचेचा हा दोष असल्याची भूमिका त्यांनी घेतली.

त्यानंतर मॅडीसनच्या पालकांनी तिला त्वरित वैद्यकीय उपचारांसाठी नेले. औषधोपचार केले गेल्यानंतर मॅडीसनच्या हातावरील फोड जरी निवळले असले, तरी या फोडांचे डाग मात्र तिच्या हातांवर कायमस्वरूपी राहणार आहेत. मॅडीसनच्या पालकांनी ही सर्व घटना सोशल मिडीयावर पोस्ट केली असून, त्यांना आला तसा अनुभव आणखी कोणाच्या वाट्याला येऊ नये आणि त्यांच्या लहान मुलीला ज्याप्रकारे वेदना सहन कराव्या लागल्या तशा वेदना इतर कोणाला सहन कराव्या लागू नयेत यासाठी सर्व पालकांना सूचित करण्याच्या उद्देशाने ही पोस्ट त्यांनी सोशल मिडियाद्वारे शेअर केली असल्याचे समजते.

Leave a Comment