प्राचीन काळामध्ये ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये खेळले जात असत असे ही खेळ !

olympic
ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा ही जागतिक पातळीवरील स्पर्धा असून, यांमध्ये अनेक क्रीडा स्पर्धांचे आयोजन होत असते. जगभरातील अनेक नामांकित खेळाडू या स्पर्धांमध्ये सहभागी होण्यासाठी येत असतात. या स्पर्धांमध्ये आयोजित निरनिराळ्या खेळांमध्ये विजयी होणे हे त्या खेळाडूंसाठी आणि ते प्रतिनिधित्व करीत असलेल्या देशासाठी मोठी सन्मानाची बाब ठरत असते. ऑलिम्पिक क्रीडास्पर्धांचा इतिहास प्राचीन काळापासूनचा आहे. ख्रिस्तपूर्व ७७६ सालामध्ये ग्रीसमधील ऑलिम्पिया या ठिकाणी या स्पर्धांचे सर्वप्रथम आयोजन झाले. त्यानंतर ख्रिस्तपूर्व ३९३ सालापर्यंत या क्रीडास्पर्धा नेमाने होत गेल्या. त्यानंतर मात्र या स्पर्धांच्या आयोजनामध्ये खंड पडला. ऑलिम्पिक स्पर्धा पुन्हा एकदा अस्तित्वात येण्याअगोदर तब्बल १५०० वर्षांचा काळ उलटून गेला आणि इतक्या मोठ्या कालखंडानंतर आधुनिक ऑलिम्पिक स्पर्धा पुन्हा एकदा ग्रीसमधील अथेन्स शहरामध्ये १८९६ साली सर्वप्रथम आयोजित झाल्या. त्या काळी या स्पर्धांमध्ये असे अनेक खेळ समाविष्ट होते, ज्यांची कल्पना ही आजच्या काळामध्ये आपण करू शकत नाही. कालांतराने हे खेळ या स्पर्धांमधून वगळले गेले आणि आधुनिक खेळांचा या स्पर्धेमध्ये समावेश करण्यात आला.
olympic1
‘रस्सीखेच’ हा खेळ १९०० ते १९२० या काळाच्या दरम्यान ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धांमध्ये समाविष्ट होता. आताच्या काळामध्ये हा खेळ आपल्याला फक्त शालेय क्रीडा स्पर्धांमध्ये किंवा सहलीच्या वेळी खेळला जाताना पहावयास मिळतो. मात्र त्या काळी हा खेळ ऑलिम्पिकमध्ये समाविष्ट असून, या स्पर्धेमध्ये सहभागी होणाऱ्या दोन्ही गटांमध्ये प्रत्येकी आठ खेळाडू असत. जो गट दुसऱ्या गटाला सहा फुटांपेक्षा जास्त अंतर ओढत नेईल तो गट विजयी होत असे. जर ठराविक वेळेमध्ये सामना संपला नाही, तर पंच आणखी पाच मिनिटे सामन्यासाठी वाढवून देत असत. या स्पर्धेमध्ये नेहमी ब्रिटीश खेळाडूंचे वर्चस्व असून, ब्रिटीश खेळाडूंमध्ये मुख्यत्वे ब्रिटीश पोलीस दलातील कर्मचारी (बॉबी) खेळाडू म्हणून सहभागी होत असत.
olympic2
पाण्यामध्ये सूर मारून तरणपटू एका झटक्यात किती अंतर पोहून जाऊ शकतो हे पाहणाऱ्या स्पर्धेला ‘प्लन्जिंग’ म्हटले जात असे. ही स्पर्धा ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये केवळ एकदाच समाविष्ट केली गेली होती. या खेळामध्ये तरणपटू जलतरण तलावामध्ये सूर मारत असे, आणि पाण्यामध्ये ‘ग्लाईड’ करत असे. जो तरणपटू सर्वाधिक अंतर ‘ग्लाईड’ करून जात असे, तो तरणपटू विजयी ठरत असे. या खेळासाठी तरणपटूला साठ सेकंदांची समयसीमा असे. तरणपटू जेवढे अंतर पाण्यामधून ‘ग्लाईड’ करून जात असे, ते अंतर पंच मोजत असत, आणि मग अंतिम विजेता ठरत असे. केवळ एकदाच आयोजित या खेळामध्ये अमेरिकन खेळाडू विजयी ठरले होते, कारण या स्पर्धेमध्ये भाग घेणारे केवळ तेच स्पर्धक होते !
olympic3
आकाशामध्ये उडणाऱ्या कबुतरांचा अचूक वेध घेण्याची स्पर्धा देखील एके काळी ऑलिम्पिकमध्ये समाविष्ट होती. त्यानंतर १९०८ साली ही स्पर्धा बंद होऊन हरणांचा वेध घेण्याच्या स्पर्धा सुरु झाल्या. या स्पर्धेची विशेषता अशी, की ही हरणे जिवंत नसून, पुठ्ठ्याची बनविलेली असत. १८९६ ते १९३२ सालापर्यंत आयोजित झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये ‘रोप क्लाईंबिंग’, म्हणजेच दोरावर चढण्याच्या स्पर्धा आयोजित केल्या जात असत. या स्पर्धेमध्ये पंचवीस फुट लांबीच्या दोरावर सर्वाधिक वेगाने चढणारा खेळाडू विजयी ठरत असे. यामध्ये १९०४ साली जॉर्ज आयझर नामक विकलांग खेळाडूने या स्पर्धेमध्ये मिळविलेला विजय उल्लेखनीय ठरला होता.

Leave a Comment