घरामध्ये भरभराट आणि समृद्धी नांदावी या करिता काही वास्तू टिप्स

vastu
घर असो, वा ऑफिस वास्तूशास्त्राचे प्रभाव प्रत्येक व्यक्तीच्या जीवनावर होतच असतात. यातील काही प्रभाव अतिशय शुभ फल देणारे, तर काही अशुभ फल देणारे असतात. म्हणूनच घराची रचना करताना किंवा घरामध्ये वस्तूंची मांडणी करताना वास्तूशास्त्राचे काही महत्वाचे नियम लक्षात घेणे अगत्याचे ठरते. हे नियम लक्षात घेऊन जर घराची वास्तूरचना आणि घरातील वस्तूंची मांडणी केली गेली, तर घरामध्ये नेहमी सकारात्मक वातावरण आणि सुख समृद्धी नांदते. घरामधील तिजोरी किंवा महत्वाचे जिन्नस ठेवण्याच्या कपाटाच्या वर शक्यतो इतर अवजड सामान ठेवलेले नसावे. त्याचबरोबर ज्या ठिकाणी धनसंचय केला जातो, त्या ठिकाणी विवादास्पद संपत्तीशी निगडीत कागदपत्रे ठेवणेही वास्तूशास्त्राच्या अनुसार अशुभ मानले गेले आहे.
vastu1
घरामध्ये ज्या ठिकाणी वास्तूदोष निर्माण झाला असेल त्या ठिकाणी शंख ठेऊन त्याची नेमाने पूजा केल्याने वास्तूदोष दूर होतो. जर घरामध्ये शंख नसेल, तर दररोज नित्याची पूजा आटोपल्यानंतर वास्तुदोष असलेल्या ठिकाणी घंटानाद केल्याने वास्तुदोष दूर होण्यास मदत होते. घंटानादामुळे घरातील नकारात्मक उर्जाही नष्ट होते. हिंदू धर्मामध्ये तुळशीला मोठे महत्व आहे. तुळस ही केवळ धार्मिक दृष्ट्याच नाही तर आरोग्याच्या दृष्टीने देखील महत्वपूर्ण औषधी आहे. त्यामुळे दररोज संध्याकाळी तुळशीपाशी दिवा लावण्याची प्रथा आपल्याकडे फार प्राचीन काळापासून रूढ आहे. यामुळे घरातील वास्तुदोष आणि नकारात्मक शक्ती नष्ट होत असल्याचे म्हटले जाते. घरामध्ये असलेली सर्व घड्याळे चालू स्थितीमध्ये असणे इष्ट आहे. जर एखादे घड्याळ बंद पडलेच असेल, तर ते त्वरित सुरु करवून घ्यावे. त्याचप्रमाणे घरामध्ये तुटलेले आरसे किंवा तडा गेलेल्या काचेच्या वस्तूही साठवून ठेऊ नयेत.
vastu2
शयनकक्षातील पलंगाच्या खाली पादत्राणे किंवा इतर अडगळीचे सामान नसावे. पलंगाच्या खाली अडगळ ठेवल्याने सकारात्मक शक्तीचे योग्य रीतीने संचरण होऊ शकत नाही. या खोलीमध्ये आपले ड्रेसिंग टेबल असले, तर त्याचा आरसा पलंगाच्या बरोबर समोर नसावा. तसेच कोणत्याही खोलीमध्ये दरवाजाच्या एकदम समोरही आरसा ठेवला जाऊ नये. घरातील देवघर उत्तराभिमुख किंवा पूर्वाभिमुख ठेवलेले असावे. तसेच देवघर जमिनीवर न ठेवता आपल्या नजरेच्या समोर (आय लेव्हलवर) असावे. देवघराच्या वर कोणत्याही प्रकारचे सामान रचून ठेऊ नये. वास्तूशास्त्राच्या अनुसार रात्रीच्या वेळी खरकटी भांडी स्वयंपाकघरामध्ये पसरून न ठेवता व्यवस्थित एकत्र करून ठेवली जावीत. स्वयंपाकघर अस्ताव्यस्त असेल तर त्या घरामध्ये सतत आर्थिक अडचणी येऊ लागतात आणि घरातल्या मंडळींच्या आरोग्यासंबंधी तक्रारी वारंवार उद्भवू लागत असल्याचे ही वास्तूशास्त्र सांगते.

Leave a Comment