घरातील लाकडी फर्निचरवरून बुरशी हटविण्यासाठी आजमावा हे उपाय

mold
आजकाल घरामध्ये शेल्फ, कपाटे, टेबले आणि इतरही फर्निचर तयार करण्यासाठी लाकडाबरोबरच पार्टिकल बोर्डचा वापरही सर्रास केला जाऊ लागला आहे. किंबहुना पार्टिकल बोर्डपासून तयार केलेले फर्निचर लाकडी फर्निचरपेक्षा वजनाला हलके आणि किंमतीनेही पुष्कळ कमी असते. त्यामुळे आजकाल पार्टिकल बोर्ड पासून तयार करण्यात येणाऱ्या फर्निचरला बाजारामध्ये चांगली मागणी आहे. पण अनेकदा या पार्टिकल बोर्डच्या किंवा क्वचित लाकडी फर्निचरवरही राखाडी, काळसर बुरशी दिसून येते. यालाच इंग्रजी भाषेमध्ये ‘मोल्ड’ म्हटले जाते. विशेषतः ज्या वस्तू कपाटांमधून अनेक महिने अजिबात हलविल्या जात नाहीत, त्या ठिकाणी किंवा दमटपणा असलेल्या ठिकाणी ही बुरशी आढळून येते. ही बुरशी हटविण्यासाठी काही उपायांचा अवलंब करता येईल.
mold1
सर्वात आधी ज्या ठिकाणी बुरशी लागली असेल ते कपाट किंवा शेल्फ रिकामे करावे. एका बादलीमध्ये दोन लिटर पाण्यामध्ये पाव कप लिक्विड ब्लीच मिसळावे. या मिश्रणाने संपूर्ण कपाट किंवा शेल्फ पुसून काढावे. हे मिश्रण वापरताना हातामध्ये रबरी किंवा प्लास्टिकचे ग्लोव्हज घालणे आवश्यक आहे. ज्या ठिकाणी बुरशी लागलेली आहे ते शेल्फ व्यवस्थित पुसून घेऊन कोरडे होऊ द्यावे. तेथील वस्तू परत ठेवण्यापूर्वी त्या वस्तूही जंतूनाशक ‘वाइप्स’ ने स्वच्छ पुसून घेऊन मगच शेल्फ मध्ये किंवा कपाटांमध्ये ठेवाव्यात. जर कपाटामध्ये कपडे किंवा पुस्तके ठेवायची असतील तर पुस्तकांना, आणि कपड्यांना थोडा वेळ चांगले ऊन दाखवून मगच या वस्तू कपाटांमध्ये परत ठेवाव्यात.
mold2
ज्या ठिकाणी हवा दमट असते त्याठिकाणी फर्निचरवर बुरशी येण्याची शक्यता जास्त असते. अशा वेळी जर फर्निचर सहज हलविता येण्याजोगे असेल तर थोड्या थोड्या महिन्यांनी फर्निचर काही वेळ उन्हामध्ये ठेवावे. तसेच फर्निचर ज्या ठिकाणी ठेवले असेल तिथे हवा खेळती राहील याची काळजी घ्यावी. फर्निचर भिंतीला एकदम चिकटवून न ठेवता भिंतीपासून काही सेंटीमीटर लांब ठेवावे. पार्टिकल बोर्ड पासून बनलेल्या शेल्फ, कॅबिनेट किंवा टेबलसारख्या वस्तूंवर ओल्या वस्तू फार काळाकरिता ठेवल्या जाणार नाहीत याची काळजी घ्यावी. फुलदाण्या, फ्लोटिंग कॅन्डल्स सारख्या शोभेच्या वस्तू या फर्निचरवर ठेवताना त्या खाली एखादे कोस्टर किंवा कापडी रुमाल ठेवावा, जेणेकरून या वस्तूंमधील पाण्यामुळे फर्निचर सतत ओले राहणार नाही.
mold3
बाजारामध्ये ‘अँटी मोल्ड’ पॉलिश उपलब्ध असतात, त्यांचा वापर आपल्या फर्निचरसाठी करावा. हे पॉलिश वापरण्या पूर्वी आपल्या फर्निचरवरील धूळ स्वच्छ झाडून घेऊन फर्निचर स्वच्छ पुसून घ्यावे आणि मगच हे पॉलिश फर्निचरवर लावावे. या पॉलिशचा वापर वर्षातून एकदा किंवा दोनदा करावा. एरव्ही देखील फर्निचरची नियमित स्वच्छता करणे गरजेचे असते. हे फर्निचर पुसून काढताना कोरड्या कपड्यानेच पुसून घ्यावे. त्यामुळे या फर्निचरवर दमटपणामुळे बुरशी येण्याची शक्यता पुष्कळ अंशी कमी होते.

Leave a Comment