निरनिराळ्या गुलाबांच्या रंगांचे अर्थ आहेत तरी काय?

rose
अतिशय सुवासिक आणि सुंदर दिसणारे असे गुलाबाचे फुल असल्याने गुलाबाला ‘क्वीन ऑफ फ्लावर्स’ म्हटले जाते. या फुलाला सौंदर्याचे असे काही वरदान निसर्गाने दिले आहे, की आपल्या मनातील भावना व्यक्त करण्यासाठी या फुलांचा वापर केवळ आजच्या काळामधेच नाही, तर फार जुन्या काळापासून प्रचलित आहे. रोमन साम्राज्याच्या काळापासून या फुलांचा वापर भेट म्हणून केला जात असल्याचा उल्लेख सापडतो. या फुलाच्या अनेक निरनिरळ्या जाती आणि रंग जगभरामध्ये पहावयास मिळत असून, यातील प्रत्येक रंगाचे खास असे महत्व आहे. गुलाबांचे निरनिराळे रंग हे मानवी मनाच्या निरनिराळ्या भावना दर्शविणारे आहेत.
rose1
लाल गुलाबांचा देखणा पुष्पगुच्छ प्रेमाचे प्रतीक आहे. मात्र हा पुष्पगुच्छ आपल्या जवळच्या व्यक्तीला भेट देताना तो उजव्या हाताने दिला जावा असा प्रघात युरोपीय देशांमध्ये रूढ आहे. किंबहुना डाव्या हातामध्ये लाल गुलाबांचा पुष्पगुच्छ धरणे, किंवा डाव्या हाताने तो समोरच्या व्यक्तीला भेट देणे निषिद्ध मानले गेले आहे. प्राचीन मान्यतांच्या अनुसार डाव्या हातामध्ये लाल गुलाबांचा पुष्पगुच्छ धरणे परस्परांवरील प्रेमासाठी अशुभ मानले गेले आहे. लाल गुलाबांप्रमाणेच गडद लाल किंवा ‘वाईन’ रंगाची गुलाबाची फुले देखील आत्यंतिक प्रेमाचे प्रतीक आहेत.
rose2
शुभ्र पांढऱ्या रंगाचे गुलाब हे नव्या सुरुवातीचे प्रतीक आहेत. म्हणूनच नव्याने वैवाहिक जीवनाला सुरुवात करणाऱ्या ख्रिश्चन नववधूंच्या हाती पांढऱ्या गुलाबांचा पुष्पगुच्छ देण्याची प्रथा पाश्चात्य देशांमध्ये रूढ आहे. पांढऱ्या रंगाचे गुलाब हे आदराचे आणि स्मृतीचे, आठवणींचेही प्रतीक आहेत, त्यामुळे समाधीस्थळांवर आपली आदरभावना व्यक्त करण्यासाठी पांढरे गुलाब वाहण्याचा प्रघात आहे. काहीशी पिवळसर झाक असलेले पांढरे गुलाब ‘आयव्हरी’ रंगाचे म्हटले जातात. एखाद्याच्या बद्दल आपल्या मनामध्ये असलेली आपुलकी दर्शविण्यासाठी या रंगाचे गुलाब भेट दिले जातात.
rose3
प्राचीन काळामध्ये पिवळ्या रंगाचे गुलाब भेट देण्याची पद्धत पाश्चात्य देशांमध्ये अभावानेच आढळून येत असे. पिवळा रंग हा ईर्ष्या, किंवा मत्सराचे प्रतीक समजला जात असून, हा रंग आपल्या जोडीदाराशी केल्या गेलेल्या अप्रामाणिक वर्तनाचे प्रतीक समजला जात असे. म्हणूनच पाश्चात्य देशांमध्ये शक्यतो पिवळ्या गुलाबांचा पुष्पगुच्छ भेट दिला जात नसे. अलीकडच्या काळामध्ये मात्र पिवळ्या रंगांचे गुलाब हे मैत्री, आणि आपुलकीचे प्रतीक समजले जात असून, आपल्या मित्र मंडळींना या रंगाचे गुलाब भेट देण्याची पद्धत आता रूढ झाली आहे. हलक्या गुलाबी रंगाचे गुलाब हे आपल्याला एखाद्या व्यक्तीबद्दल वाटणारे आकर्षण दर्शविण्यासाठी वापरले जातात, तर गडद गुलाबी रंगाचे गुलाब आदर, कृतज्ञता व्यक्त करणारे आहेत.
rose4
‘पीच’ रंगाचे गुलाब हे आदर आणि कृतज्ञता व्यक्त करणारे असून, एखाद्या ठिकाणी मेजवानीसाठी किंवा काही कार्यक्रमासाठी आमंत्रित केले गेले असता, यजमानांना या रंगाच्या गुलाबांचा पुष्पगुच्छ देऊन आपल्याला आमंत्रण दिल्याबद्दल कृतज्ञता दर्शविणारा हा रंग आहे. काहीसे दुर्मिळ असे केशरी रंगाचे गुलाब हे सकारात्मक उर्जेचे, उत्साहाचे आणि आनंदाचे प्रतीक आहेत. तर यामध्येच थोडीशी गुलाबी छटा असलेले ‘कोरल’ रंगाचे गुलाबही एखाया व्यक्तीबद्दल आपल्याला वाटणारे आकर्षण आणि ओढ, त्याला भेटण्याची उत्सुकता दर्शविणारे आहेत. हलक्या जांभळ्या रंगाचे गुलाब हे राजेशाहीचे प्रतीक असून, आपली प्रेमभावना व्यक्त करण्यासाठी या रंगाच्या गुलाबांचे महत्व आहे. निळ्या आणि हिरव्या रंगांचे गुलाब अतिशय दुर्मिळ असले, तरी या रंगांनाही स्वतःचे खास महत्व आहे. निळ्या रंगाचे गुलाब एखाद्याबद्द्ल वाटणारे कुतूहल दर्शविणारे आहेत, तर हिरव्या रंगाचे गुलाब संपन्नता आणि भरभराटीचे प्रतीक आहेत. मनःशांती प्रदान करणारा असा हा गुलाब आहे.

Leave a Comment