अपचनापासून दूर रहा.. अवलंबा हे साधे उपाय


आपल्या आवडीचे खाद्यपदार्थ जेवणासाठी केले गेले असले की जरा दोन घास जास्तच खाल्ले जातात. तेवढ्यापुरते मनाचे समाधान होते, पण नंतर अपचन, जळजळ, पित्त, गॅसेस यांसारख्या त्रासांना सामोरे जावे लागते. त्यामुळे आवडते पदार्थ मनसोक्त खाता आल्याच्या आनंदावर विरजण पडते. या त्रासापासून स्वतःचा बचाव करायचा असेल तर काही लहान लहान गोष्टींची काळजी घेणे गरजेचे आहे.

अपचनाचे मुख्य कारण आहे जेवताना घास व्यवस्थित न चावणे. प्रत्येक घास बत्तीस वेळा चावून खावा अशी शिकवण आपल्याला लहानपणापासून दिली गेलेली असते. त्यामुळे अन्न शरीरातील पाचक रसांबरोबर एकरूप होण्यास मदत मिळते. पण आजकाल घाई-घाईत जेवण उरकले जाते. त्यातूनही टीव्ही बघता बघता किंवा मोबाईल वर मेसेजेस वाचता वाचता जेवण उरकले जाते. त्यामुळे प्रत्येक घास लक्षपूर्वक चावून खाण्याकडे दुर्लक्ष केले जाते. घाईमध्ये जेवण उरकण्याच्या नादामध्ये अन्नाबरोबर हवाही गिळली जाते आणि मग गॅसेस चा त्रास सुरु होतो. हे टाळण्यासाठी जेवताना प्रत्येक घास व्यवस्थित चावून खावा. तसेच शांत वातावरणात प्रत्येक घासाचा मनसोक्त आस्वाद घेत जेवण घ्यावे.

आपल्याला जेवढी भूक असेल तेवढेच अन्न सेवन करावे. प्रत्येक जेवणाच्या किंवा नाश्त्याच्या मध्ये साधारण पाच तासांचा वेळ असावा. ज्या व्यक्ती वजन कमी करण्यासाठी डायटिंग करीत असतील त्यांचा दिवसभराचा आहार कमी कॅलरीजचा असतो. अश्या व्यक्तींनी दर दोन ते तीन तासांच्या अंतराने आपल्या आहारतज्ञाने आखून दिलेल्या आहाराप्रमाणे भोजनाचे सेवन करावे. दोन जेवणांच्या मध्ये योग्य अंतर ठेवले गेल्याने पचनक्रियेसाठी पुरेसा अवधी मिळतो.

आपल्या आहारामध्ये कृत्रिम स्वीटनर्स चा उपयोग टाळायला हवा. ह्या कृत्रिम स्वीटनर्स मध्ये सॉरबिटोल नावाचा पदार्थ असतो. हा पदार्थ पचविण्यास कठीण असतो. तसेच फळांमध्ये असणारे फ्रुक्टोज ही पचण्यास कठीण असते. त्यामुळे ज्यांना सतत अपचनाचा त्रास होतो, त्यांनी या पदार्थांच्या सेवनावर नियंत्रण ठेवावयास हवे. साखरेऐवजी किंवा कृत्रिम स्वीटनर्स वापरण्याऐवजी गुळाचा किंवा मधाचा वापर करावा.

ज्यांना वारंवार अपचन, किंवा गॅसेस चा त्रास होतो अश्या व्यक्तींनी प्रोसेस्ड खाद्यपदार्थांचा वापर मर्यादित करावा. आजकाल ‘ रेडी टू ईट’ असणाऱ्या पॅकेज्ड खाद्यपदार्थांची जिकडेतिकडे रेलचेल आहे. ताजे अन्न शिजवून खाण्यासाठी वेळेचा अभाव असलेले लोक ह्या खाद्यपदार्थांना प्राधान्य देताना दिसत आहेत. पण या खाद्यपदार्थांमध्ये प्रिझर्वेटीव्ह, खाण्याचे कृत्रिम रंग आणि इतर अॅडीटिव्ह असतात, जे सहज पचविले जात नाहीत. त्यामुळे या खाद्यपदार्थांच्या सेवनाने गॅसेस होणे, पोटात जडपणा वाटत राहणे, जळजळ होणे असल्या तक्रारी सुरु होतात. शिवाय प्रोसेस्ड खाद्यपदार्थांमधून शरीराला आवश्यक पोषण मिळत नाही. त्यामुळे अश्या पदार्थांचा अतिवापर शक्यतो टाळावा. तसेच कोला आणि इतर कार्बोनेटेड पेयांचा वापरही मर्यादापूर्वक करावा.

अन्नाचे पचन व्यवस्थित व्हावे यासाठी आहार नियंत्रणाबरोबर नियमित व्यायाम देखील गरजेचा असतो. व्यायामामुळे शरीरातील इतर सर्व स्नायूंबरोबर पोटाचे स्नायू व आतडी देखील सक्रीय राहतात. दिवसभरामध्ये किमान दोन ते तीन लिटर पाण्याचे सेवन करावे. शरीरामध्ये पाण्याची मात्रा कमी होत असेल, तर जेवढे पाणी शरीरामध्ये आहे ते साठवून ठेवण्याचे काम शरीर करत असते. त्यामुळे पोट फुगल्याची भावना होऊ शकते. तसेच आपल्या आहारामध्ये मीठाचे प्रमाण अधिक असले तरी शरीरामध्ये पाणी साठत राहू शकते. त्यामुळे पाणी पिण्याचे प्रमाण वाढवून, आहारातील मिठाचे प्रमाण शक्यतो कमी करावे. आपल्या आहारातील कॅफिन च्या मात्रेवरही नियंत्रण ठेवावे.

लॅक्टोज किंवा ग्लुटेन असलेल्या खाद्यपदार्थांसाठी पचनसंस्था संवेदनशील असेल तरी अपचनाचा त्रास उद्भवू शकतो. त्यासाठी वैद्यकीय तपासणी करवून घेऊन आपली पचन संस्था ग्लुटेन किंवा लॅक्टोज युक्त पदार्थ पचवू शकत नसल्यास तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या आहारामध्ये योग्य ते फेरबदल करावेत.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment