अशा प्रकारची घटना महाराष्ट्राची मान खाली घालणारी : सुधीर मुनगंटीवार


मुंबई – तब्बल 13 रुग्णांचा वसईमधील कोविड रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात लागलेल्या भीषण आगीत होरपळून मृत्यू झाला. ही आग विरारमधील विजय वल्लभ रुग्णालयातील अतिदक्षता विभागात लागली होती. या रुग्णालयातील अतिदक्षता विभागात एकूण 17 रुग्णांवर उपचार सुरु होते. त्यापैकी 13 रुग्णांना आपले प्राण गमवावे लागले. दरम्यान, आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला आता यश आले आहे. दरम्यान भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी अशा पद्धतीने मृत्यू होणं हे महाराष्ट्रासाठी धक्कादायक तर आहेच पण महाराष्ट्राची मान खाली घालणारी घटना असल्याचे म्हटले.

दरम्यान विरारमधील विजय वल्लभ रुग्णालयातील अतिदक्षता विभागाला भीषण आग लागली. या आगीत 13 जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. सेंट्रलाईज्ड एसीचा स्फोट होऊन ही दुर्घटना घडल्याची प्राथमिक माहिती आहे. या दुर्घटनेवरून आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्यावर भाजप नेते किरीट सोमय्या यांनी निशाणा साधला आहे.

महाराष्ट्रात कोविड मृत्यूतांडव सुरू आहे. ठाकरे सरकारने आता हा प्रतिष्ठेचा मुद्दा न बनवता केंद्र सरकार, लष्कराची मदत घ्यावी. तसेच राजेश टोपेंना घरी बसवले पाहिजे, अशी टीका किरीट सोमय्या यांनी केली आहे. तसेच महाराष्ट्रातील सर्व कोविड केंद्रामधील ऑक्सिजन आणि फायर ऑडिट तातडीने करण्यात यावे. यासाठी या श्रेत्रातील तज्ज्ञांची मदत घेण्यात यावी. तसेच महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपेंना घरी बसवलं पाहिजे, असं किरीट सोमय्या यांनी आपल्या एका ट्विटमध्ये म्हटले आहे.