सुमित्रा महाजन यांची प्रकृती एकदम ठणठणीत, अफवांचे मुलाकडून खंडन


मुंबई : माजी लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन यांच्या प्रकृती संदर्भातील बातम्या काहीवेळा पूर्वी सोशल मीडियावर व्हायरल झाल्या होत्या. त्यानंतर सुमित्रा महाजन यांच्या मुलाने या संदर्भातील एक व्हिडीओ शेअर करत सुमित्रा महाजन यांची तब्येत एकदम ठणठणीत असून व्हायरल झालेल्या बातम्या पूर्णपणे निराधार असल्याचे सांगितले. तसेच सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या बातम्यांचे खंडन केले आहे.

सुमित्रा महाजन यांच्या प्रकृतीसंदर्भात काँग्रेस नेते शशी थरुर यांनी अधिकृत ट्विटर हॅण्डलवरुन ट्वीट केले होते. त्यानंतर, अनेकांकडून सुमित्रा महाजन यांच्या प्रकृतीसंदर्भात ट्वीट करण्यात आले होते. पण, सुमित्रा महाजन यांच्या प्रकृतीसंदर्भातील ते वृत्त खोटे असल्याचे भाजपकडून स्पष्ट करण्यात आले.


यासंदर्भातील माहिती ट्वीट करुन भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस कैलाश विजयवर्गीय यांनी दिली. आपल्या ट्वीटमध्ये ते म्हणाले, ताई एकदम स्वस्थ असून.. त्यांना दीर्घायुष्य लाभो…!. कैलाश विजयवर्गीय यांच्या ट्वीटनंतर थरुर यांनी आपले ट्वीट डिलीट केल्यामुळे ही बातमी अफवा असल्याचे स्पष्ट झाले.


त्याचबरोबर सुमित्रा महाजन यांचे पुत्र मंदार महाजन म्हणाले की, माझ्या आईची तब्येत उत्तम आहे. आईच्या प्रकृतीविषयी ज्या उलटसुलट चर्चा सोशल मीडियावर झाल्या आहेत, त्या अफवा असून कृपया त्यावर विश्वास ठेवू नका. मी संध्याकाळीच आईला भेटलो असून ती एकदम ठणठणीत आहे. आईची कोरोना चाचणी देखील निगेटिव्ह आहे.