माझ्या त्या शब्दाचा विपर्यास करू नये एवढीच माझी माध्यमांना विनंती – राजेश टोपे


मुंबई – राज्यातील कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज मुख्यमंत्र्यासोबत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक पार पडली. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे देखील बैठकीस होते. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी या बैठकीनंतर विविध मुद्यांबाबत पत्रकारपरिषद घेत माहिती दिली. दरम्यान यावेळी विरार दुर्घटनेबाबत केलेल्या वक्तव्याबद्दल माध्यमांनी त्यांना विचारल्यानंतर आरोग्यमंत्री टोपे यांनी माझ्या त्या शब्दाचा विपर्यास करू नये, एवढीच माझी माध्यमांना विनंती राहील, असे म्हणत स्पष्टीकरण दिले.

टोपे म्हणाले, माध्यमेदेखील मला पाहत आहेत व राज्यातील जनता देखील पाहत आहे. माझ्यावर आलेल्या अतिदुःखाच्या प्रसंगात देखील मी माझे कर्तव्य व जबाबदारीला नेहमीच महत्व दिलेले आहे. अत्यंत संवेदनशीलतेने काम करणारा मी कार्यकर्ता आहे. जे विचार माझ्या मनात असतात, ते नेहमी सामान्य माणसाला त्रास होऊ नये, यासाठी मी संपूर्ण संवेदनशीलतेने काम करत आलेलो आहे. त्यामुळे मला वाटतं माध्यमांना या सगळ्या गोष्टींची माहिती आहे.

मला आजच तुम्ही पाहात आहात असे नाही, वर्षभरापासून कोरोनाकाळात देखील पाहात आहात. त्यामुळे ही घटना घडल्यानंतर पहिली प्रतिक्रिया देणारा मंत्री मीच होतो. मी सर्व माध्यमांना प्रतिक्रिया दिली. ज्यामध्ये स्पष्ट सांगितले की ही अत्यंत दुर्दैवी व दुःखद घटना आहे. मनाला व हृदयला पिळवटून टाकणारी घटना आहे. मृत्यू झालेल्यांच्या परिवारातील लोकांच्या दुःखात आम्ही मनापासून सहभागी आहोत. जे काही सरकारने या सगळ्या परिस्थितीत करणे शक्य आहे, ते सर्व आम्ही करणार आहोत. मी सकाळीच सर्व माध्यमांना हे सगळे सांगितलेले आहे. सगळ्या गोष्टींची कडक तपासणी होईल, जिथे निष्काळजीपणा आढळून येईल तिथे कारवाई होईल. पण माझ्या शब्दाचा विपर्यास करू नये एवढीच माझी माध्यमांना विनंती राहील, असे टोपेंनी यावेळी सांगितले.

विरारमधील विजय वल्लभ रुग्णालयामध्ये शुक्रवारी पहाटेच्या सुमारास लागलेल्या आगीमध्ये कोरोनाबाधित १३ रुग्णांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. असे असतानाच ही दुर्घटना राज्य सरकारच्या अंतर्गत बाब असून राष्ट्रीय स्तरावरील बातमी नसल्याचे राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी म्हटल्याचे समोर आले होते. ऑक्सिजनसंदर्भात आज पंतप्रधान मोदींशी बोलणार आहोत. रेमडेसिवीरसंदर्भात बोलणार आहोत. विरार रुग्णालय आग दुर्घटना ही राष्ट्रीय बातमी नाही. आम्ही राज्य सरकारच्या वतीने पूर्णपणे मदत करणार असल्याचे टोपे म्हणाले होते.