वाराणसीच्या जिल्हाधिकाऱ्यांचे सर्व रुग्णालयांना नव्या रुग्णांना दाखल न करण्याचे आदेश


वाराणसी – कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे संपूर्ण देशात ऑक्सिजनची टंचाई निर्माण झाली आहे. ऑक्सिजनचा पुरवठा करणारी यंत्रणा देशातील अनेक राज्यांमध्ये कोलमडली आहे. असे असतानाच बुधवारी केंद्र सरकारला दिल्ली उच्च न्यायालयानेही चांगलेच फेलावर घेत, भीक मागा, उधार घ्या, चोरी करा पण ऑक्सिजन द्या, असं उद्वेगाने सुनावले आहे.

एकीकडे सरकारची उच्च न्यायालयाकडून कानउघडणी केली जात असतानाच दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदींचा लोकसभा मतदारसंघ असणाऱ्या वाराणसीमध्ये केवळ आज संध्याकाळपर्यंत पुरेल एवढाच ऑक्सिजन साठा उपलब्ध आहे. परिस्थिती एवढी गंभीर आहे की रुग्णालयांमध्ये दाखल रुग्णांना डिस्चार्ज दिल्याशिवाय नवीन रुग्ण दाखल करु नये, असे सांगण्यात आले आहे.

यासंदर्भात न्यूज १८ ने दिलेल्या वृत्तानुसार गुरुवारी (२२ एप्रिल २०२१) दुपारी साडेबाराच्या सुमारास हाती आलेल्या माहितीप्रमाणे केवळ १० तास पुरेल एवढा ऑक्सिजन साठा वाराणसीमधील रुग्णालयांमध्ये उपलब्ध आहे. कोरोनामुळे निर्माण झालेल्या ऑक्सिजन टंचाईमुळे जिल्हाधिकारी कौशल राज शर्म यांनी सर्व खासगी रुग्णालयांसाठी निर्देश जारी केले आहेत.

या निर्देशांनुसार रुग्णालयांमधील ऑक्सिजनचा साठा लक्षात घेऊनच रुग्णांना रुग्णालयामध्ये दाखल करुन त्यांच्यावर उपचार करावेत, असे सांगण्यात आले आहे. तसेच जोपर्यंत कोरोना रुग्णालयांमध्ये सध्या दाखल असणाऱ्या रुग्णांवर उपचार करुन त्यांना घरी सोडण्यात येत नाही, तोपर्यंत नवीन रुग्णांना दाखल करुन घेऊ नये, असेही म्हटले आहे.