रशियाची लस ७५० रुपयांत मिळणार

१८ वर्षांवरील सर्वाना कोविड १९ लस घेण्याची परवानगी दिल्याची घोषणा सरकारने नुकतीच केली आहे. रशियाची स्पुतनिक पाच लस मे अखेर किंवा जूनच्या सुरवातीला भारतात लाँच केली जाईल असे डॉ. रेड्डीज लॅबॉरेटरिजचे संचालक आणि सह अध्यक्ष जीव्ही प्रसाद यांनी मंगळवारी सांगितले. ते म्हणाले भारतात या लसीची किंमत ७५० रुपयांपर्यंत असेल. भारताने या लसीला आपत्कालीन वापरासाठी नुकतीच परवानगी दिली आहे.

प्रसाद या संदर्भात अधिक माहिती देताना म्हणाले, रशियन एफडीआय व रेड्डीज कराराअंतर्गत लसीची आयात केली जाणार असून आयात वाढविण्याचे प्रयत्न सुरु आहेत. याच तिमाहीत ही लस लाँच केली जाईल. तिच्या कोल्ड चेन आणि अन्य देखभालीची व्यवस्था पूर्ण झाली आहे. स्पुतनिक पाच लस उपलब्ध झाली की देशात अधिक वेगाने आणि अधिक संखेने लसीकरण करणे शक्य होणार आहे. खासगी संस्था सुद्धा या लसीचा वापर करू शकणार आहेत.

रशियाने जगासाठी या लसीच्या डोसची किंमत १० डॉलर ठेवली आहे. या लसीच्या चाचण्या भारतात झाल्या आहेत आणि त्यात ही लस ९१.५ टक्के प्रभावी असल्याचे दिसून आले आहे. सध्या २५ कोटी डोस आयात केले जात असून त्यातून साडेबारा कोटी नागरिकांचे लसीकरण होऊ शकणार आहे. दुसऱ्या तिमाही पासून या लसीचे उत्पादन भारतात सुरु होईल आणि त्यात एक किंवा अधिक औषध कंपन्या सहभागी होतील असेही प्रसाद म्हणाले. जागतिक उत्पादनाच्या ७० टक्के उत्पादन भारतातच होईल असा अंदाज त्यांनी व्यक्त केला आहे.