नवी नियमावली; सकाळी 7 ते 11 यावेळेत खुली राहणार राज्यातील सर्व दुकाने


मुंबई : राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असतानाच राज्यात या पार्श्वभूमीवर निर्बंध लागू असतानाही किराणा खरेदीच्या नावाखाली नागरिक दिवसभर बाहेर फिरत आहेत. त्यामुळे किराणा दुकानांची वेळ सकाळी 7 ते 11 वाजेपर्यंत मर्यादित ठेवण्याचा निर्णय काल उपमुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत घेण्यात आला. ज्याची घोषणा आज करण्यात आली.

राज्यातील सर्व किराणा, भाजी दुकाने, फळ दुकाने , डेअरी, बेकरी, कनफेकशनरी, सर्व खाद्य दुकाने ( चिकन, मटन, पोल्ट्री , फिश सह), कृषि उत्पादनशी संबंधित दुकाने , पाळीव प्राण्यांची खाद्य दुकाने, येणाऱ्या पावसाळ्याशी संबंधित वस्तूंची दुकाने ही दररोज सकाळी 7 ते सकाळी 11 या वेळेतच सुरू राहतील. पण या दुकानांना सकाळी 7 ते रात्री 8 यावेळेत होम डिलिव्हरी करता येईल. स्थानिक प्रशासन त्यांच्या वेळांच्या बाबतीत परिस्थिती पाहून निर्णय घेतील.

काल दिवसभरात राज्यात 58 हजार 412 कोरोनाबाधितांची वाढ झाली आहे. दिलासादायक बाब म्हणजे काल 52 हजार 412 कोरोनाबाधित बरे झाले आहेत. आतापर्यंत एकूण 39 लाख 59 हजार 240 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. राज्यात एकूण 6 लाख 76 हजार 520 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 81.04 टक्के झाले आहे. काल एकूण 351 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या मृत्यूदर 1.56 टक्के आहे. आतापर्यंत एकूण 60 हजार 824 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. काल नोंद झालेल्या 351 मृत्यूंपैकी 220 मृत्यू मागील 48 तासातील आहेत. तर 85 मृत्यू मागील आठवड्यातील आहेत. उर्वरित 46 मृत्यू हे एक आठवड्यापेक्षा अधिक कालावधीतील आहेत.