मजुरांचा मसीहा अभिनेता सोनू सूद करोनाच्या विळख्यात

बॉलीवूड अभिनेता आणि गेल्या करोना लाटेत परराज्यात अडकून पडलेल्या हजारो मजुरांना आपापल्या गावी जाण्यासाठी मदत करणारा सोनू सूद स्वतः करोना संक्रमित झाला आहे. सोनुने या संदर्भात ट्विटरवरून माहिती देताना म्हटले आहे,’ कोविड १९ टेस्ट पोझिटिव्ह आली आहे. मी आयसोलेशन मध्ये आहे पण काळजी नको. आता मला आणखी मोकळा वेळ मिळणार आहे त्यामुळे तुमच्या कोणत्याही अडचणी सांगा, मी तुमच्या सोबत आहे.’

सोनूने ७ एप्रिल रोजी करोना लस घेतली होती आणि त्या नंतर १० दिवसांनी त्याची कोविड १९ टेस्ट पोझिटिव्ह आली. पंजाबच्या करोना लसीकरण मोहिमेचा सोनू सदिच्छा दूत असून त्याने १० एप्रिल रोजी पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदरसिंग यांची भेट घेतली होती.

गतवर्षी करोना काळात सोनुने प्रवासी मजुरांना मदतीचा मोठा हात दिला होता. हजारो मजुरांच्या राहण्याची जेवणाची व्यवस्था तसेच गावी जाण्यासाठी तिकिटांची व्यवस्था त्याने केली होती. सोशल मिडियाच्या सहाय्याने त्याने त्याचे मदतकार्य सुरु ठेवले आहे. सोनूच्या चित्रपट कारकीर्दीची सुरवात १९९९ मध्ये तमिळ चित्रपटातून झाली. बॉलीवूड मध्ये त्याने २००२ मध्ये शहीद ए आझम चित्रपटातून एन्ट्री केली होती.