सध्या लोकांच्या जिवांपेक्षा जास्त दुसरे काहीही महत्त्वाचे नाही – सोनू निगम


देशासह राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा उद्रेक झालेला असतानाच मध्य प्रदेशातील हरिद्वारमध्ये कुंभमेळ्याला सुरूवात झाली होती. देशात कुंभमेळ्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू शकतो, अशी भीती सातत्याने व्यक्त केली जात होती. त्यानंतर कुंभमेळा प्रातिनिधीक स्वरूपात करण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. आता कुंभमेळ्याच्या आयोजनावरून गायक सोनू निगमने नाराजी व्यक्त केली आहे.


इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ सोनू निगमने पोस्ट केला असून, कुंभमेळा कोरोनाच्या काळात आयोजित करायला नको होता, असे त्याने म्हटले आहे. मी दुसऱ्यांविषयी काही म्हणू शकत नाही. पण, एक हिंदू म्हणून हे निश्चितच सांगू शकतो की, कुंभमेळा व्हायला नको होता. असो चांगले झाले, थोडी सुबुद्धी झाली आणि याला प्रातिनिधिक स्वरूपात करण्यात आले. लोकांची श्रद्धा मी समजू शकतो. पण, मला वाटते की लोकांच्या जिवांपेक्षा सध्या दुसरे काहीही जास्त महत्त्वाचे नसल्याचे सोनूने म्हटले आहे.

कार्यक्रम करण्याची आमची इच्छा होत नाही, असे तुम्हाला वाटते का? पण कार्यक्रम व्हायला नको, असे मला वाटते, असे एक गायक म्हणून मी सांगतो. कदाचित सोशल डिस्टन्सिंग पाळले जाईल, असे कार्यक्रम होऊ शकतात. पण, परिस्थिती खूप खराब आहे. आपण हे समजून घ्यायला हवे. सव्वा वर्षापासून लोकांच्या हाताला काम नाही, पण कोरोनाकडे दुर्लक्ष करू शकत नाही. माझी पत्नीही कोरोनाशी लढा देत असल्याचे सोनू निगमने म्हटले आहे.