रिलेशनशिपमध्ये असाल, तर या गोष्टींचा जरूर करा विचार

relation
आपल्याला समजून घेणारा, आपल्या विचाराशी जुळणारे विचार असणारा जोडीदार सर्वांनाच हवा असतो. त्याचबरोबर आपल्या जोडीदाराशी आपले नाते सदैव तणावरहित असावे अशी ही आपली अपेक्षा असते. पण आपल्या कळत नकळत आपल्या हातून अश्या काही गोष्टी घडतात, ज्यामुळे मतभेद होऊ शकतात. परिणामी नातेसंबंधातील तणाव वाढू शकतो. त्यामुळे जर तुम्ही रिलेशनशिप मध्ये असाल, तर काही गोष्टी लक्षात घेणे आवश्यक आहे, जेणेकरून तुमच्या जोडीदाराबरोबरचे तुमचे नाते भक्कम विश्वासाचे आणि प्रेमाचे राहील.
relation1
एखादी व्यक्ती रिलेशनशिपमध्ये जरी असली, तरी तिला स्वतःचे वैयक्तिक जीवनही असतेच, वैयक्तिक प्रश्न, समस्याही असतात. या सर्वच समस्यांचे निदान करण्याची ओढाताण करू नये. काही वैयक्तिक प्रश्न हे ज्याने त्याने आपापल्या पद्धतीनेच सोडवायचे असतात. तसेच आपल्या जोडीदाराच्या आयुष्यामध्ये उद्भविलेल्या एखाद्या समस्येसाठी सतत त्याला किंवा तिला दोष देणे टाळावे. जर आपला जोडीदार त्याची समस्या आपल्यासमोर व्यक्त करीत असेल, तर कोणतेही मतप्रदर्शन करण्याआधी त्याचे म्हणणे पूर्ण ऐकून घ्यावे. आपल्या जोडीदाराची मनस्थिती समजून घेण्याचा प्रयत्न करून आवश्यक असल्यास आणि शक्य असल्यास सल्ला द्यावा.
relation2
वादविवाद किंवा मतभेद हे कोणत्याही नातेसंबंधाचा अविभाज्य भाग असतात. त्यामुळे आपल्या जोडीदाराशी काही कारणावरून कधी मतभेद झालेच तर त्याविषयीची नाराजी मनामध्ये फार काळ राहू देऊ नये. तसेच अकारण चर्चा करत बसून वादाचा विषय फार ताणूनही धरू नये. कोणताही प्रश्न चर्चा करून सोडविता येऊ शकतो. त्यामुळे आपली मते योग्य प्रकारे मांडून तसेच जोडीदाराची मतेही लक्षपूर्वक ऐकून घेऊन प्रश्नावर तोडगा काढणे शक्य असते. त्याचप्रमाणे जोडीदाराशी अबोला न धरता आपल्या मनामधील विचार स्पष्टपणे मांडावेत.
relation3
आपल्या जोडीदाराच्या अनेक लहान मोठ्या सवयी किंवा त्याचे वागणे आपल्याला अनेकदा खटकत असते. त्यावरून मनामध्ये राग न धरता त्याकडे दुर्लक्ष करण्याची सवय आत्मसात करावी. आपले वागणे किंवा आपल्या लहान मोठ्या सवयी आपल्याही जोडीदाराला खटकत असू शकतात. पण म्हणून या गोष्टीचा बाऊ करण्याच्या ऐवजी एकत्र बसून, चर्चेने समस्या सोडविण्यावर भर द्यावा. तसेच जोडीदारामध्ये असलेल्या लहानसहान दोषांच्या ऐवजी त्याच्यामध्ये असलेल्या गुणांवर आपले अधिक लक्ष असावे.
relation4
प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये काही महत्वाकांक्षा असतात, काही ध्येये असतात. आपल्या जोडीदाराच्या महत्वाकांक्षा आणि त्याच्या ध्येयांचा आदर ठेवावा. आपल्या जोडीदाराच्या ध्येयांची, किंवा त्याकडे वाटचाल करताना आलेल्या अडचणींवरून, अपयशावरून त्याची थट्टा-मस्करी करणे आवर्जून टाळावे. त्याउलट जरी अपयश आले, तरी धीर न सोडता ध्येयाकडे वाटचाल करण्याची प्रेरणा द्यावी. आपल्या जोडीदाराकडून आपल्या काही अपेक्षा असतात. त्यांनी त्या अपेक्षा पूर्ण कराव्यात असे ही आपल्याला वाटत असते. अश्या वेळी त्याने आपल्या मनामध्ये आहे ते ओळखावे आणि त्याप्रमाणे वागावे अशी अपेक्षा आपलाच हिरमोड करणारी ठरू शकते. आपले जोडीदार मनकवडे असतीलच असे नाही, त्यामुळे आपल्या मनामध्ये जे काही आहे ते स्पष्टपणे सांगावे. त्यामुळे निष्कारण होणारे वादविवाद टाळता येतात.

Leave a Comment