१८७५ साली आयर्लंडमधील डब्लिनमध्ये आला होता जळत्या व्हिस्कीचा पूर !

whisky
आजवरच्या जागतिक इतिहासामध्ये अनेक अविश्वसनीय घटना घडून गेल्या आहेत. अशीच एक घटना घडली १८७५ साली आयर्लंड देशातील डब्लिन शहरमध्ये. ही घटना आहे १८ जुलै १८७५ सालची. त्या रात्री डब्लिन शहराच्या रस्त्यांमधून चक्क जळत्या व्हीस्कीचे पाटच्या पाट वाहू लागले. या घटनेच्या परिणामस्वरूप तेरा लोकांना आपले प्राण गमवावे लागले होते. मात्र यातील सर्व लोकांचा मृत्यू आगीच्या भक्य्चस्थानी पडून झाला नव्हता, तर अल्कोहोल पॉयझनिंग मुळे या सर्वांना आपले प्राण गमवावे लागले होते.
whisky1
या घटनेची सविस्तर हकीकत अशी, की आयर्लंडची राजधानी असलेल्या डब्लिन शहरामध्ये असेलल्या एका मद्याच्या गोदामामध्ये अचानक आग लागली. गोदामामध्ये असेलल्या व्हिस्कीच्या ५००० बॅरल्स पर्यंत ही आग पाहता पाहता पसरली. आगीमुळे या बॅरल्सचे स्फोट होऊन यामध्ये असलेली व्हिस्की ओसंडून वाहू लागली. काहीच सेकंदांच्या अवधीमध्ये डब्लिनच्या रस्त्यांमधून जळत्या व्हिस्कीचे लोट वाहू लागले. गोदामामध्ये लागलेली ही भीषण आग झपाट्याने आसपासच्या इमारती भस्मसात करत पसरू लागली.
whisky2
रस्त्यातून जळत्या व्हिस्कीचा आलेला पूर, ही नागरिकांना अपूर्वाईची संधी वाटली. मोफत पिण्यास मिळणाऱ्या मद्याच्या लालसेने लोकांनी हातामध्ये येईल त्या वस्तूंमध्ये व्हिस्की भरून घेऊन ती पिण्यास सुरुवात केली. अगदी घरातील भांडीकुंडी इथपासून ते अक्षरशः आपल्या टोप्यांमध्ये आणि जोड्यांमध्येही व्हिस्की भरून पिण्याची संधी लोकांनी सोडली नाही. मात्र हे मद्य प्राशन करण्याचा मोह लोकांना चांगलाच महागात पडला. मद्यप्राशन केल्याच्या थोड्याच अवधीमध्ये लोकांची शुद्ध हरपू लागली. ज्यांनी प्रमाणाबाहेर मद्यप्राशन केले होते, त्यांना मद्यातून विषबाधा झाल्याने प्राणांना मुकावे लागले होते.

अखेरीस अनेक तासांच्या अथक प्रयत्नांनंतर डब्लिनमधील अग्निशमन दलाला आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले. ही आग मद्यामुळे पसरली असल्याने ती विझविण्यासाठी अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी आग ज्या मार्गाने पसरत चालली होती, त्या मार्गावर घोड्याच्या शेणाची मोठी भिंतच उभारली होती. या भिंतीमुळे आग पुढे पसरू शकली नाही आणि त्यावर नियंत्रण मिळविण्यात अग्निशमन दलाला यश आले. मात्र तत्पूर्वी तेरा लोकांना या अपघातामध्ये आपल्या प्राणांना मुकावे लागले होते.

Leave a Comment