हा आहे एक मिलियन डॉलर्स किंमतीचा ‘क्रिस्टल बाथटब’

bath-tub
जर गाठीशी पैसा असेल तर जगातील कोणीतीही वस्तू खरेदी करता येऊ शकते, अगदी क्रिस्टल बाथटब देखील. इटलीतील ‘बाल्डी होम ज्युवेल्स’ या एका अतिशय महागड्या डिझायनिंग फर्मने क्रिस्टलने बनलेला बाथटब तयार केला असून, अशा एका डिझायनर बाथटबची किंमत तब्बल एक मिलियन डॉलर्स आहे. अरब देशांमधील काही अतिश्रीमंत ग्राहकांच्या मागणीवरून हे बाथटब्स तयार करण्यात आले असल्याचे समजते.
bath-tub1
हे बाथटब तयार करण्यासाठी वापरण्यात आलेले मौल्यवान पाषाण ब्राझील देशातील अॅमेझॉन रेनफॉरेस्ट मधून मागविले गेले असून त्यानंतर इटलीतील फ्लोरेंस शहरामध्ये हे मौल्यवान पाषाण पाठविण्यात आले. तेथील तरबेज कारागीरांच्या करवी हे पाषाण कोरण्यात येऊन त्यामधून हे सुंदर बाथटब तयार करण्यात आल्याचे समजते. हे पाषाण कोरून बाथटब तयार करण्यासाठी या कारागिरांनी अनेक दिवस मेहनत घेतली असून, तीन निरनिराळ्या प्रकारचे क्रिस्टल बाथटब या कारागिरांनी तयार केले आहेत. यामध्ये ग्रीन क्वार्ट्झ, रॉक क्रिस्टल आणि रोझ क्वार्ट्झ हे तीन प्रकारचे क्रिस्टल बाथटब तयार करण्यात आले आहेत.
bath-tub2
‘बाल्डी होम ज्युवेल्स’ या कंपनीने आजवर अनेक अब्जाधीशांकारिता अशा प्रकारच्या आलिशान आणि मौल्यवान वस्तू तयार डिझाईन केल्या असून एका नामांकित सोशलाईट करिता हिरेजडीत आणि सोन्याचे नळ असलेला बाथटबही या कंपनीने या पूर्वी तयार केला आहे. आता या कंपनीने तयार केलेले क्रिस्टल बाथटब लांबीला सहा फुटांचे असून, यांची खोली दोन फुटांची आहे. एका वेळी तीन व्यक्ती आरामात बसून शकतील इतके हे बाथटब प्रशस्त आहेत. ‘क्रिस्टल’ हा पाषाण आरोग्याच्या दृष्टीने उपयुक्त समजला जात असून, यामधून सकारात्मक उर्जा मिळत असल्याचे म्हटले जाते. हे बाथटब आता दुबई येथील ‘XXII कॅरट व्हिला’ या आलिशान कॉम्प्लेक्समध्ये जाण्यासाठी सिद्ध असून, येथील बावीस आलिशान व्हिलाजमध्ये हे बाथटब लावले जाणार असल्याचे समजते.

Leave a Comment