जगामध्ये अस्तित्वात आहेत चहाच्या अशाही विविधता

tea
वेळ सकाळची असो, दुपारची असो, किंवा संध्याकाळची असो, एक कप गरमागरम चहा पिण्याची आपली नेहमीच तयारी असते, किंबहुना दिवसाची प्रसन्न सुरुवात करून देणारे असे हे पेय आहे. आपल्याकडे अगदी ठिकठिकाणी, रस्त्यांच्या कडेने असलेल्या चहाच्या लहान दुकानांमध्येही दिवसाच्या कुठल्याही वेळेला आवर्जून गर्दी पहावयास मिळत असते. आजकाल तर चहाच्या अनेक व्हरायटी बाजारामध्ये उपलब्ध असून, प्रत्येकाला आपपल्या आवडीनुसार चहाची निवड करता येणे सहज शक्य झाले आहे. पण आपल्या परिचयाच्या या व्हरायटींच्या व्यतिरिक्त जगामध्ये असे काही चहाचे प्रकार अस्तित्वात आहेत ज्यांच्याबद्दल जाणून घेऊन तुम्हाला आश्चर्य वाटल्याशिवाय राहणार नाही. अगदी ‘पांडा डंग टी’ या चहाच्या प्रकारापासून ‘फर्मेंटेड याक बटर टी’ पर्यंत हे विविध चहांचे प्रकार जगामध्ये प्रचलित आहेत, आणि लोकप्रियही आहेत.
tea1
‘पांडा डंग टी’ हे चहाचे नाव ऐकून हा चहा पांडा नामक जनावराच्या शेणापासून तयार केला जात असल्याची प्रथमदर्शनी समजूत होणे साहजिक आहे. मात्र वास्तविक या चहाच्या रोपांना पांडा या जनावराच्या शेणापासून तयार केले गेलेले खत वापरले जात असल्याने या चहाच्या प्रकाराला ‘पांडा डंग टी’ हे नाव देण्यात आले आहे. चहाचा हा प्रकार चीन देशातील सिचुआन प्रांतातील ‘यान’ भागामध्ये प्रचलित असून, जगातील सर्वात महागड्या चहांपैकी असा हा चहाचा प्रकार आहे. जगामध्ये काही युरोपियन आणि आफ्रिकन प्रांतांमध्ये ‘टोमाटो-मिंट टी’ अतिशय लोकप्रिय आहे. नावाप्रमाणेच टोमॅटो आणि पुदिना घालून बनविला गेलेल्या या बिनदुधाच्या चहाची चव एखाद्या चविष्ट सूप प्रमाणे लागते.
tea2
‘सिलोसायबिन मशरूम्स’ पासून बनविला जाणारा चहा काही प्रांतांमध्ये लोकप्रिय असला, तरी या विशिष्ट प्रकारच्या मशरुम्सची गणना अंमली पदार्थांमध्ये होत असल्याने भारतामध्ये हा चहा तुम्हाला पहावयास मिळणार नाही. याचप्रमाणे आणखी एक चहाचा प्रकार म्हणने ‘साल्व्हीया टी’. हा चहाचा प्रकार मेक्सिको मध्ये खास लोकप्रिय असून काही खास धार्मिक कार्यक्रमांच्या निमित्ताने ह्या चहाचे सेवन केले जाण्याची पद्धत येथे रूढ आहे. हा चहा देखील अंमली पदार्थांमध्ये समाविष्ट होत असल्याने इतर देशांमध्ये मात्र या चहाच्या प्रकारावर बंदी घालण्यात आली आहे.
tea3
भारतातील हिमालय पर्वतराजीच्या नजीकचे प्रांत, नेपाल, भूतान, आणि तिबेटच्या डोंगराळ भागांमध्ये ‘याक बटर टी’ अतिशय लोकप्रिय आहे. नेहमीच्या चहामध्ये याक प्राण्याच्या दुधापासून तयार करण्यात आलेलले लोणी घालून हे मिश्रण फेटून हा फेसाळ चहा बनविला जातो. हा चहा तयार करण्याची एक विशिष्ट पद्धत असून, या चहामध्ये मिठाचा वापरही केला जातो. हा चहा बनविण्याची पद्धत अतिशय वेळ घेणारी असून, जास्त प्रमाणांत हा चहा बनवायचा असल्यास हा तयार करण्यासाठी अर्धा दिवसही खर्ची होत असतो. भारतामध्ये लेह, लद्दाख प्रांतांमध्ये भटकंती साठी गेल्यानंतर या चहाचा आस्वाद घेण्याची संधी तुम्हाला नक्कीच मिळू शकते.

Leave a Comment