मुंबई, ठाणे शिधावाटप क्षेत्रात लाभार्थ्यांनी ‘वन नेशन वन रेशनकार्ड’ योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन


मुंबई : राज्यातील तसेच केंद्रशासित प्रदेशातील कोणताही NFSA कार्डधारक बायोमेट्रिक आधार प्रमाणित करुन कोणत्याही राज्यातून धान्य घेऊ शकतो. या योजनेंतर्गत 15 एप्रिल 2021 पर्यंत मुंबई, ठाणे शिधावाटप क्षेत्रात इतर राज्यातील 1474 शिधापत्रिकाधारकांनी पोर्टेबिलिटीद्वारे धान्य घेतले असून लाभार्थ्यांनी ‘वन नेशन वन रेशन कार्ड’ योजनेचा जास्तीत जास्त लाभ घेण्याचे आवाहन शिधावाटप नियंत्रक व नागरी पुरवठा मुंबईचे संचालक कैलास पगारे यांनी केले आहे.

‘वन नेशन वन रेशन कार्ड’ या योजनेची सुरुवात 2018 मध्ये Integrated Management of Public Distribution System (IM-PDS) म्हणून करण्यात आली. केंद्र शासनाच्या या योजनेंतर्गत संबंधित रास्तभाव दुकानात आधार प्रमाणीकरण करुन लाभार्थ्यांना पोर्टेबिलिटीद्वारे देशातील कोणत्याही राज्यातील कोणत्याही रास्त भाव दुकानातून तसेच राज्यातील कोणत्याही जिल्ह्यातून धान्य उचलण्याची सोय उपलब्ध आहे. याकरिता लाभार्थ्यांना सद्यस्थितीत असलेल्या शिधापत्रिकांवरील 12 अंकी क्रमांकाचा वापर करुन आधार प्रमाणीकरणाद्वारे धान्य वितरित करण्यात येते.

या योजनेची मुंबई/ठाणे शिधावाटप क्षेत्रात प्रभावी अंमलबजावणी होण्याच्या दृष्टीने दि.12 सप्टेंबर 2020 रोजी राष्ट्रीय अन्नसुरक्षा दिवस साजरा करण्यात आला. तसेच या योजनेची जनजागृती होऊन लाभार्थ्यांना योजनेमध्ये लाभ मिळावा या करिता सर्व शिधावाटप कार्यालयामार्फत पोस्टर्सची छपाई करुन सर्व अधिकृत शिधावाटप दुकानामार्फत ई-पॉस मशीनद्वारे धान्यवाटप करण्यात येते. या योजनेचे उद्दिष्ट व फायदे नागरिकांना समजावून सांगण्याचे काम सर्व शिधावाटप अधिकाऱ्यामार्फत करण्यात येते.

‘वन नेशन वन रेशन कार्ड’ या योजनेच्या माहितीकरिता हेल्पलाईन क्र.14445 कार्यान्वित करण्यात आली आहे. तसेच ई-मेल :[email protected] कार्यान्वित आहे.

मुंबई, ठाणे शिधावाटप क्षेत्रातील सर्व पात्र लाभार्थ्यांना याद्वारे आवाहन करण्यात येते की, अन्नधान्याचा मुबलक साठा उपलब्ध असल्यामुळे निकषात बसणाऱ्या सर्व पात्र लाभार्थी शिधापत्रिकाधारकांनी अधिकृत शिधावाटप दुकानातून गर्दी न करता शारीरिक अंतर ठेवून तसेच मास्कचा वापर करुन योजनानिहाय अन्नधान्य प्राप्त करुन घ्यावे.