कोरोना उपाययोजनांसाठी आमदार निधीतून एक कोटी रक्कम खर्च करण्यास शासन देणार मंजुरी – अजित पवार


पुणे : सध्या कोरोनाची रुग्णसंख्या वाढत असून कोरोना नियंत्रणासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. राज्यातील सर्व आमदारांना कोविड-19 विषयक बाबींसाठी आमदार निधीतील एक कोटी निधी खर्च करण्यासाठी राज्य शासन मंजुरी देईल, असे उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी सांगितले.

पुण्यातील विधानभवन (कौन्सिल हॉल) येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली कोरोना परिस्थिती आणि उपाययोजनांबाबत आढावा बैठक घेण्यात आली, यावेळी ते बोलत होते. कोरोना विषाणूची सद्यस्थिती, प्रशासनाच्या वतीने करण्यात येणाऱ्या उपाययोजना तसेच लसीकरणाबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बैठकीत माहिती जाणून घेतली.

कोरोनाबाधित रुग्णांसाठी आरोग्य विषयक सेवा-सुविधांमध्ये वाढ करा, असे सांगून उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, यशवंतराव चव्हाण रुग्णालय व दळवी रुग्णालयात लिक्विड ऑक्सिजन जनरेटर प्लॅन्ट उभा करावा. मनुष्यबळाअभावी शासकीय रुग्णालयात वापर होत नसलेले व्हेंटिलेटर खाजगी रुग्णालयांना तात्पुरत्या स्वरूपात वापरासाठी द्यावेत.

पुणे, पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रामध्ये नवीन विद्युतदाहिनी बसविण्याची कार्यवाही करावी. डॉक्टरांच्या कामांच्या वेळेचे नियोजन करा. शहर व ग्रामीण भागात ऑक्सिजन व व्हेंटिलेटरयुक्त बेड कमी पडणार नाहीत, याकडे लक्ष द्या. गृह अलगीकरणातील रुग्णांकडून नियमांची काटेकोर पालन होते का, याकडे लक्ष द्या. रेमडेसिविरच्या बाबतीत कडक धोरण राबवा, अशा सूचनाही त्यांनी संबंधित यंत्रणेला दिल्या.

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, पुणे, पिंपरी-चिंचवडसह जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी सर्वांनी नियम पाळून सहकार्य करणे आवश्यक आहे. नागरिकांनी कडक नियम पाळावेत, अन्यथा कोरोना संसर्ग रोखण्यासाठी आणखी कडक लॉकडाऊन करावा लागेल, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.

महापौर मुरलीधर मोहोळ यांनी पुणे महानगरपालिकेच्या वतीने कोरोना नियंत्रणासाठी करण्यात येत असलेल्या उपाययोजनांबाबत माहिती दिली. सद्यपरिस्थितीत आवश्यक असणाऱ्या बाबींची माहिती दिली.

खासदार डॉ. अमोल कोल्हे म्हणाले, रेमडेसिवीरबाबतचे गैरसमज दूर करण्यासाठी जनजागृती करायला हवी. ऑक्सिजन निर्मिती व पुरवठा सुरळीत होण्यासाठी नियोजन व्हायला हवे.

आमदार चंद्रकांत पाटील म्हणाले, सर्व मतदार संघांमध्ये लोकसहभागातून बेडची संख्या वाढवण्यासाठी लोकप्रतिनिधीनी प्रयत्न करायला हवेत. लसीकरणाचा वेग वाढवायला हवा.

डॉ. सुभाष साळुंके यांनी कोविड -19च्या नियंत्रणासाठी आवश्यक असणाऱ्या उपाययोजनांबाबत माहिती दिली. येत्या काळात रुग्णांवर योग्य उपचार होण्यासाठी योग्य नियोजन करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. रेमडेसिवीर इंजेक्शनच्या वापराबाबत आवश्यक त्या सर्व मार्गदर्शक सूचना डॉक्टरांना द्यायला हव्यात.

विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी ट्रॅकिंग, टेस्टिंग, कंटेन्मेंट झोन, लसीकरण व्यवस्था, रुग्णालयीन व्यवस्थापन, रुग्णदर, मृत्यू दर, पुणे ग्रामीण भागातील रुग्णवाहिका उपलब्धता, जम्बो कोविड रुग्णालय व्यवस्थापन, ऑक्सिजन व रेमडेसिवीर मागणी व सद्यस्थिती तसेच पुणे जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची क्षेत्रनिहाय माहिती सादरीकरणाद्वारे दिली.

जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी ग्रामीण भागातील कोविड-19 सद्यस्थितीची माहिती दिली. प्रशासनाच्या वतीने करण्यात येत असलेल्या उपाययोजनांची माहिती त्यांनी दिली. यावेळी विविध यंत्रणांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.