नवाब मलिकांवर भाजप नेत्यांचा पलटवार; पुरावा द्या अन्यथा माफी मागा


मुंबई – रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा राज्यात जाणवत असून, यासंदर्भात मोदी सरकारवर राज्याचे अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी खळबळजनक आरोप केला आहे. १६ कंपन्यांना रेमडेसिवीरच्या पुरवठ्याबद्दल राज्य सरकारने विचारणा केली. त्यावर महाराष्ट्राला रेमडेसिवीर न देण्याचे केंद्राकडून सांगण्यात आल्याचे कंपन्यांचे म्हणणे असल्याचे मलिक म्हणाले. मलिक यांनी केलेल्या धक्कादायक आरोपानंतर भाजप नेत्यांनी पलटवार केला आहे.


नवाब मलिक यांनी केलेल्या आरोपावर भाजप मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी प्रत्युत्तर दिले असून, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुढे येऊन भूमिका मांडावी, असेही म्हटले आहे. अशा प्रकारचे निराधार आरोप करण्याऐवजी नवाब मलिक यांनी पुरावा द्यावा अन्यथा माफी मागावी. परिस्थिती बिकट असून, महाविकास आघाडी सरकारने दोषारोपाचे खेळ थांबवावेत आणि कोरोना परिस्थिती हाताळावी. ही जर राज्य सरकारची अधिकृत भूमिका असेल, तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वतः पुढे यावे आणि वस्तुस्थिती स्पष्ट करावी. नाहीतर अशा प्रकारचे निराधार आणि बेजबाबदार आरोप करण्यापासून आपल्या मंत्र्यांना थांबवावे, असे केशव उपाध्ये यांनी म्हटले आहे.
https://www.facebook.com/ChDadaPatil/posts/2835882676728922
दरम्यान भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी देखील मलिकांच्या आरोपाला प्रत्युत्तर दिले आहे. कोरोनाच्या कठिण काळात गलिच्छ राजकारण करू नका असा सल्ला चंद्रकांत पाटील यांनी त्यांना दिला आहे. एवढेच नाही तर उद्धव ठाकरे यांनी अशा बेजबाबदार मंत्र्यांना वेळीच थांबवावे, असे आवाहनही केले आहे. चंद्रकांत पाटील यांनी फेसबुकवर एक पोस्ट करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना हे आवाहन केले आहे.

कोरोना काळात राजकारण नको, असे सल्ले देणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी आधी नवाब मालिकांना आवरावे. आज Nawab Malik यांनी केंद्रावर केलेले आरोप हे अतिशय तथ्यहीन आणि निराधार आहेत. नवाब मलिक यांनी असे तथ्यहीन आणि निराधार आरोप करण्याऐवजी पुरावे द्यावे अन्यथा माफी मागावी !

त्यांच्या जावयाला ड्रग्स प्रकरणी एनसीबीने अटक केली… त्या गोष्टीचा आजही त्यांच्या मनात एवढा रोष आहे की, स्वतःच्या आणि आपल्या सरकारच्या प्रत्येक अपयशाचे खापर ते केंद्रावर किंवा अन्य अधिकाऱ्यांवर फोडतात.

कोरोनाच्या या कठीण काळात गलिच्छ राजकारण करण्यापेक्षा महाविकास आघाडी सरकारने जनतेला आरोग्य सुविधा पुरवाव्या आणि आपले कर्तव्य पार पाडावे. मुख्यमंत्री Uddhav Thackeray यांनी या प्रकरणात लक्ष घालून आपल्या मंत्र्यांना अशा बेजबाबदार आणि निराधार आरोप करण्यापासून वेळीच थांबावे !