तनामनाला ताजेपणा देणारा पुदिना

mint
नुसत्या दर्शनाने आणि वासाने मनाला तसेच शरीराला ताजेपणा देणारा पुदिना अनेक विकारांवर उत्तम घरगुती हर्बल उपचार ठरू शकतो याची माहिती अनेकांना असेल. पुदिन्याचा ताजा स्वाद आणि सुगंध मेंदूला त्वरित ताजेपणा देतो याचा अनुभव अनेकांनी अनेकदा घेतलाही असेल. विशेष म्हणजे अनेक अनावश्यक औषधांचे सेवन कमी करण्यास हा अल्पमोली आणि बहुगुणी पुदिना फारच उपयुक्त आहे.

stomach
संशोधनात असे स्पष्ट झाले आहे की, माणसाची पचनक्रिया सुधारण्यात पुदिना महत्वाची कामगिरी बजावतो. पोटाच्या विकारांशी लढण्यास तो उपयुक्त आहेच पण बद्धकोष्ठ्ता, पोटदुखी यातही पुदिना फायदेशीर आहे. विशेष म्हणजे पुदिन्याची पाने नुसती चावून खाता येतात, त्याचे चूर्ण घेता येते. ताजा पुदिना स्वच्छ धुवून नुसता खाल्ला तरी तोंडाला रुची देतो आणि पचन सुधारतो.

teamint
उन्हाळ्याच्या दिवसात अनेकदा कडक उन्हाचा त्रास होतो. कधी सनस्ट्रोक होतो. ज्यांना उन्हात बाहेर पडणे आवश्यक आहे त्यांनी घरातून निघताना पुदिन्याचा थोडा रस पिऊन बाहेर पडले तर उन्हाचा त्रास होत नाही. पुदिन्याचे सेवन चिंता, मानसिक ताण कमी करणारे आहे. त्यातील मेंथोल स्नानु रीलॅक्स करणारे आहे. डोके दुखत असेल तर यामुळेच डोकेदुखी कमी होते तसेच मायग्रेन असेल तर त्यापासून आराम मिळतो. घसा खवखवत असेल तर पुदिना त्यावर आराम देतो.

pudina
पुदिना तोंडाला ताजेपणा देतो. त्यामुळे श्वास दुर्गंधी कमी होते. पुदिन्यातील मेंथोलमुळे फ्रेशनेस मिळतो. यामुळेच बहुतेक माउथ फ्रेशनर मध्ये पुदिना वापरला जातो. पुदिना बॅक्टेरीयांबरोबर लढणारा आहे. त्यामुळे तोंडचा घाणेरडा वास कमी होतो. डोकेदुखीत कपाळावर पुदिना तेल चोळले किंवा पुदिना घातलेला चहा प्यायला तर त्वरित आराम मिळतो. पुदिना सौंदर्यवाढीसाठी उपयुक्त आहे. अनेक ब्युटी प्रोडक्ट्समध्ये पुदिना वापरला जातो. तो त्वचेच्या पेशींना नवीन उर्जा देणारा आणि त्वचा ओलसर ठेवणारा आहे.

पुदिना घरातील कुंडीत सहज लावता येतो त्यामुळे दररोज ताजा पुदिना मिळू शकतो. पुदिन्याची सामोशाबरोबर दिली जाणारी चटणी केवळ रुची वाढवत नाही तर जंक फुड सहज पचण्यासाठीही काम करते. ताप कमी करण्यासठी तसेच सूज कमी करण्यासाठी पुदिना वापरला जातो तसेच कीटक चावल्यामुळे येणारी सूज आणि जळजळ पुदिन्याची पाने नुसती चाव्याच्या ठिकाणी रगडली तरी कमी होते. पुदिना नुसती पाने, ज्यूस, अर्क अशा विविध प्रकारे वापरता येतो.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment