दोन ते तीन दिवस सहन करावा लागणार ‘रेमडेसिवीर’चा तुटवडा !


मुंबई – एकीकडे राज्यावर ओढावलेले कोरोनाचे संकट दिवसेंदिवस अजूनच गडद होत असताना दुसरीकडे आरोग्य यंत्रणा कोलमडत असल्याचे चित्र दिसत आहे. राज्यातील अनेक ठिकाणी बेड्स, ऑक्सिजन, व्हेंटिलेटर्ससह रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा जाणवत आहे. परिणामी कोरोनाबाधितांचे हाल होत आहेत. या पार्श्वभूमीवर राज्यातील रेमडेसिवीरचा साठा वाढण्यासंदर्भात एक महत्वपूर्ण बैठक पार पडली. अन्न व प्रशासनमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी या बैठकीची पत्रकार परिषदेत बोलताना सविस्तर माहिती दिली.

डॉ. राजेंद्र शिंगणे म्हणाले, आपल्याला लागणारे रेमडेसिवीरचे इंजेक्शन हे कंपन्यांकडून जवळपास आज १२ हजार ते १५ हजार एवढे कमी मिळालेले असल्यामुळे रेमडेसिवीरचा तुटवडा अजूनही दोन ते तीन दिवस सहन करावा लागणार आहे. तसेच, माझी नुकतीच काही कंपन्यांच्या एमडी व सीईओंसोबत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा झाली. भविष्यात रेमडेसिवीरचा पुरवठा कशाप्रकारे त्या कंपन्यांच्या माध्यमातून ते वाढवून देतील? किती वाढवला जाणार आहे? कारण साधरण तीन आठवड्यांपूर्वी याच कंपन्यांच्या सीईओ व एमडींसोबत मी बैठक घेतली होती.

त्यांनी मला त्यावेळेस पुढील १५ तारखेपर्यंतचा कार्यक्रम दिला होता. त्या कार्यक्रमानुसार दररोज ते महाराष्ट्राला ५५ हजार रेमडेसिवीर इंजेक्शन पुरवतील, अशी ग्वाही त्यांनी दिली होती. परंतू कालच्या तारखेपर्यंतची जर आपण सरासरी पाहिली, तर ३७ ते ३९ हजारपर्यंतच त्यांनी रेमडेसिवीर पुरवले असल्याचे डॉ. शिंगणे यांनी सांगितले.

ही सर्व आकडेवारी पाहता आणि कोरोनाबाधितांच्या संख्येत दररोज होणारी वाढ पाहता तसेच रूग्णांना रेमडेसिवीर देण्याच्या दृष्टीने आपल्याला प्रमाण वाढवणे गरजेचे आहे. त्यानुसार त्यांची व माझी चर्चा झालेली आहे. हा पुरवठा १९-२० एप्रिल नंतर सुरळीत होईल, अशा प्रकारचे आश्वासन त्यांनी मला दिलेले असल्याचे डॉ. शिंगणे म्हणाले.

त्याचबरोबर तीन- चार दिवसांअगोदर अतिशय चांगला व महत्वपूर्ण निर्णय केंद्र शासनाने घेतला. त्यांनी रेमडेसिवीरची निर्यात बंदी केली हे खूप चांगले काम झाले आहे. यामुळे निर्यातीसाठी तयार असलेला रेमडेसिवीरचा मोठा साठा देशभरातील व काही महाराष्ट्रातील कंपन्यांकडे उपलब्ध असल्याची माहिती मिळाली आहे.

या संदर्भात त्या कंपन्यांना त्यांचा माल येथे विकण्यासाठी परवानगी देण्याबाबत आम्ही कालच बैठक घेतली आहे. शिवाय विधान परिषद विरोधीपक्षनेते प्रवीण दरेकरांशी देखील बोलणे झाले आहे. आता त्या कंपन्यांशी संपर्क साधण्याचे काम आमच्या विभागाकडून सुरू असल्याची माहिती यावेळी शिंगणे यांनी दिली.