मुंडे बहिण-भावात ट्विटर वॉर


मुंबई – राज्याचे सामजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे व भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्यात आता ट्विटर वार सुरू झाल्याचे चित्र दिसत आहे. कारण, बीड जिल्ह्यात रेमडेसिवीर व लसींच्या निर्माण झालेल्या तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना पत्र लिहिताना, धनंजय मुंडेंवर पंकजा मुंडे यांनी अप्रत्यक्षपणे निशाणा साधला होता. धनंजय मुंडेंनी त्यावर ट्विट करत प्रत्युत्तर देखील दिले होते. पण आता पंकजा मुंडेंनी धनंजय मुंडेंच्या ट्विटला उत्तर दिले असून, ट्विट करत निशाणा देखील साधला आहे.

राज्याच्या भल्यासाठी PM, जिल्ह्याच्या भल्यासाठी CM आणि पवार साहेबांना ही पत्र लिहीन दखल ही घेतली जाईल! तुम्ही त्यांनी दिलेल्या संधीचा तरी सन्मान करा. तुम्ही बीडमध्ये दमडीही आणली नाही. विमा, विकास निधी, अनुदान काही नाही, माफिया मात्र आणले. जुन्या निधीचे काम तरी करा, उद्घाटन करा हक्क तुम्हाला आहेच भाऊ!, असे ट्विट करत पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडेंना टोला लगावला आहे.


पंकजा मुंडेंनी पत्रात बीडच्या सत्ताधाऱ्यांना माफियांचे हीत माहिती आहे जनतेच्या हितासाठी आम्ही लढण्यास तयार असल्याचे म्हटले होते. त्यांच्या या पत्रावरुन धनंजय मुंडे यांनी ट्विट करत त्यांना उत्तर दिले होते. ताईसाहेब, मुख्यमंत्र्यांना व आरोग्यमंत्र्यांना पत्र लिहिण्याऐवजी पूर्ण माहिती घेऊन एखादे पत्र पंतप्रधानांना पाठवावे व लसींचा पुरवठा वाढविण्याबाबत आग्रह धरावा, जेणेकरून करोनाविरुद्धच्या या लढाईत खरोखरच आपली मदत होईल, असे धनंजय मुंडे ट्विटद्वारे म्हणाले आहेत.

तसेच, सध्या दुसऱ्या डोससाठी कोव्हॅक्सिनचे १३२९० डोस बीड जिल्ह्यात शिल्लक आहेत. तसेच हा स्टॉक संपायच्या आत आणखी दोन दिवसांनी पुढील स्टॉक येईलच, हेही काहींना माहीत नसावे. पण आपल्या अचानक आलेल्या जागृतीतून जनतेमध्ये संभ्रम निर्माण होत असून त्याचा परिणाम लसीकरण प्रक्रियेवर देखील होऊ शकतो, अशी उपहासात्मक टीका धनंजय मुंडे यांनी केली होती.