कोरोनाबाधितांच्या आकडेवारीत दिल्लीने मुंबईलाही टाकले मागे


नवी दिल्ली : आता देशाची राजधानी कोरोनाचीही राजधानी बनत असल्याचे चित्र सध्या दिसून येत असून कोरोनाबाधितांच्या संख्येत या शहरात मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. दिल्लीमध्ये एकाच दिवशी, मुंबईच्या तुलनेत सर्वात जास्त कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. बुधवारी आणि गुरुवारी दिल्लीमध्ये प्रत्येकी 17 हजारांहून नव्या रुग्णांची भर पडली. ही संख्या एखाद्या शहरातील सर्वाधिक संख्या आहे. या आधी मुंबईमध्ये 4 एप्रिलला एकाच दिवशी 11,163 नव्या रुग्णाची भर पडली होती.

गुरुवारी मुंबईमध्ये 8,217 नव्या कोरोनाबाधितांची भर पडली आहे. त्यामध्ये 49 जणांचा मृत्यू झाला होता. मुंबईमध्ये आता एकूण कोरोनाबाधितांची संख्या ही पाच लाख 53 हजार 159 एवढी झाली असून मृतांची एकूण संख्या ही 12,189 वर पोहोचली आहे.

दिल्लीतील कोरोनाबाधितांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. गुरुवारी दिल्लीत 17 हजाराच्या जवळपास कोरोनाबाधितांची नोंद झाली असून त्यामध्ये 112 जणांना आपला प्राण गमावावा लागला आहे. दिल्लीमध्ये एकूण मृतांची संख्या आता 11,652 एवढी झाली आहे. दिल्लीमध्ये गुरुवारी कोरोना संक्रमणाचा दर हा 20 टक्क्यांवर पोहचला आहे, जो आतापर्यंत उच्चतम आहे.

हा दर बुधवारी 16 टक्क्यांच्या जवळपास होता. दिल्लीमध्ये कोरोनाबाधितांची एकूण संख्या ही सात लाख 84 हजार 137 एवढी झाली असून 7.18 लाख रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. दिल्लीतील अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या आता वाढली असून ती 54,309 एवढी झाली आहे.

दिल्लीतील कोरोनाबाधितांची संख्या जरी वाढत असली तरी हॉस्पिटलमध्ये बेड्सची संख्या गरजेनुसार उपलब्ध असल्याचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सांगितल्यामुळे नागरिकांनी घाबरून जाण्याचे कारण नसल्याचे म्हटले आहे.