१६८ वर्षाची झाली भारतीय रेल्वे

आजच्या घडीला दररोज अडीच कोटी प्रवाशांची वाहतूक करणारी, हजारो टन मालवाहतूक करणारी भारतीय रेल्वे आज १६८ वर्षांची झाली. माणूस, प्राणी यांचे जसे वय वाढते तसे ते वृद्ध होऊ लागतात पण भारतीय रेल्वे मात्र उलटणाऱ्या वयाबरोबर अधिकाधिक तरुण होताना दिसते आहे. आजच्याच दिवशी म्हणजे १६ एप्रिल १८५३ रोजी मुंबईच्या बोरीबंदर स्टेशनवरून ठाणे स्टेशन पर्यंतचा ३५ किमीचा प्रवास आगगाडीने सहज पूर्ण केला होता. त्यावेळी २० डबे असलेल्या या आगगाडीतून ४०० प्रवासी पहिल्या रेल्वे प्रवासाचा अनुभव घेत होते. स्टेशनवर प्रचंड गर्दी जमली होती आणि या पहिल्या आगगाडीच्या पहिल्या प्रवासाला २१ तोफांची सलामी दिली गेली होती.

या पहिल्या गाडीसाठी ब्रिटन मधून तीन इंजिने मागविली गेली होती. या गोष्टीला आता १६८ वर्षे झाली आहेत. या काळात भारतीय रेल्वेने विकासाची अनेक शिखरे काबीज केली आहेत. आज जगातील चार नंबरचे सर्वात मोठे रेल्वे नेटवर्क भारतात आहे. देशभरात या काळात ६८ हजार किमीपेक्षा अधिक लांबीचे रेल्वे ट्रॅक आहेत. १ मार्च रोजी पहिली सुपरफास्ट ब्रॉडगेज लाईन दिल्ली हावडा दरम्यात सुरु झाली. आज जगातील सर्वाधिक उंचीवरचा चिनाब नदीवरचा रेल्वे पूल भारतात बांधला गेला आहे.

देशात आज घडीला सर्वाधिक वेगाने धावणाऱ्या १० ट्रेन आहेत. पैकी सर्वाधिक म्हणजे ताशी १८० किमी वेगाने धावणारी रेल्वे आहे वंदे भारत एक्सप्रेस. त्याखालोखाल दिल्ली झांशी दरम्यान धावणारी गतिमान एक्सप्रेसचा वेग ताशी १६० किमी आहे. हबीबगंज दिल्ली शताब्दीचा वेग ताशी १५० तर सालदा दिल्ली दुरांतोचा वेग आहे ताशी १३५ किमी. दिल्ली एअरपोर्ट मेट्रो ताशी १३२ किमी वेगाने धावते आहे.

शिवाय मुंबई राजधानी, हावडा राजधानी, हावडा रांची शताब्दी, बांद्रा निजामुद्दीन गरीब रथ. हावडा आनंदविहार युवा एक्सप्रेस या रेल्वे ताशी १३० किमी वेगाने मार्गक्रमणा करत आहेत.