कोरोनाबाधितांच्या मृत्यूच्या आकडेवारीची महाविकास आघाडी सरकारकडून लपवाछपवी


मुंबई – भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी महाविकास आघाडी सरकारकडून कोरोनाबाधितांच्या मृत्यूच्या आकडेवारीची लपवाछपवी केली जात असल्याचा गंभीर आरोप केला आहे. ठाणे आणि वसईमधील आकडेवारी सादर करत किरीट सोमय्या यांनी कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. ट्विटरवर एक व्हिडीओ शेअर करत किरीट सोमय्या यांनी हा आरोप केला आहे.

ट्विटरवर एक व्हिडीओ किरीट सोमय्या यांनी पोस्ट केला आहे. ते यामध्ये म्हणतात की, वसई विरार शहरात १ ते १३ एप्रिल काळात २०१ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. पण महानगरपालिकेने फक्त २३ मृत्यू दाखवले आहेत. त्यावर खासगी रुग्णालयातील मृत्यू आम्ही धरले नव्हते, त्यात आम्ही सुधार करु, असे आयुक्त म्हणतात.


त्यांनी पुढे सांगितले आहे की, ठाण्यातील स्मशानभूमींत ३०९ जणांवर अंत्यसंस्कार झाल्याची नोंद आहे. पण ठाणे महानगरपालिका क्षेत्रात ५७ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे.

त्याचबरोबर वसई-विरार महानगरपालिका कोरोनामुळे मृत्यु झालेल्यांची आकडेवारी लपवत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. शहरात गेल्या १३ दिवसांत २०१ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला. पण, पालिकेने केवळ २३ मृत्यूंची नोंद केली. चालू वर्षात जानेवारी ते १३ एप्रिलपर्यंत कोरोनाने २९५ जणांचा बळी घेतला असताना महानगरपालिकेने केवळ ५२ मृत्यूंची नोंद केली. म्हणजेच या वर्षात आतापर्यंत पालिकेने २४३ कोरोनाबळी लपवल्याचे स्पष्ट झाले आहे.

महानगरपालिकेच्या दैनंदिन अहवालात शहरातील खासगी रुग्णालयांत मृत्यू झालेल्या रुग्णांची नोंद केली जात नव्हती. केवळ पालिका रुग्णालयांतील मृतांच्या आकड्यांची नोंद या अहवालात होते. पण, खासगी रुग्णालयांतील मृतांची नोंदही यापुढे अहवालात करण्यात येईल, असे स्पष्टीकरण वसई-विरार शहर महापालिका आयुक्त गंगाथरन डी यांनी दिले आहे.