प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना महाराष्ट्रात पुन्हा राबवावी


मुंबई :- महाराष्ट्रात कोरोनाची वाढती संख्या लक्षात घेता आणि कोरोनाला अटकाव करण्यासाठी राज्य सरकारने केलेले कडक निर्बंध लक्षात घेता सर्वसामान्य जनतेसाठी पंतप्रधान गरीब कल्याण अन्न सुरक्षा योजना पुन्हा राबविण्याची मागणी अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्राद्वारे केली आहे.

भुजबळ यांनी म्हटले आहे की, महाराष्ट्रात सध्या कोरोनाचा आलेख वाढता आहे. आणि त्याकरिता महाराष्ट्र सरकारने कडक निर्बंध लागू केले आहेत त्याचबरोबर पुढील एक ते दोन दिवसात आणखी कडक निर्बंध लावण्यात येणार आहेत. त्यामुळे राज्यातील गरीब आणि सर्वसामान्य जनतेला दिलासा देण्यासाठी तसेच कोरोना संकटाची तीव्रता कमी करण्यासाठी महाराष्ट्राला पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेची पुन्हा एकदा गरज आहे.

मागच्या लॉकडाऊनच्या काळात राज्य सरकारने केंद्राची ही योजना यशस्वीपणे राबविली. एप्रिल २०२० ते नोव्हेंबर २०२० पर्यंत सूरू असलेल्या या योजनेचा लाभ सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी राज्य सरकारने देखील प्रयत्न केले. त्याचप्रमाणे मे २०२० मध्ये केंद्र सरकारने आत्मनिर्भर भारत योजनेअंतर्गत घोषित केल्याप्रमाणे मे २०२० आणि जून २०२० मध्ये देखील राज्य शासनाने तांदूळ आणि चणाडाळ महाराष्ट्रातील ४२ लाख ३० हजार ७३५ रेशनकार्ड नसलेल्या लाभार्थ्यांना वितरित केली असल्याची माहितीदेखील भुजबळ यांनी दिली.

पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत महाराष्ट्रासाठी सध्या 1.40 लाख मेट्रिक टन तांदळाची तर 2.40 लाख मेट्रिक टन गव्हाची गरज असून राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेचे लाभार्थी असलेल्या ६ करोड ४७ लाख लाभार्थ्यांपर्यंत हे धान्य पोहोचवू शकतो.आणि त्याचबरोबर १.५१ करोड कार्डधारक लाभार्थ्यांपर्यंत पोहचविण्यासाठी १५,१०० मेट्रिक टन तूरडाळीची गरज आहे. त्यामुळे राज्याला पुढील ६ महिन्यासाठी २५ लाख मेट्रिक टन म्हणजेच प्रत्येक महिन्याला ४ लाख मेट्रिक टन धान्य उपलब्ध करून देण्याची विनंती भुजबळ यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केली आहे.