योगी आदित्यनाथ सेल्फ आयसोलेशन मध्ये 

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ते सेल्फ आयसोलेशन मध्ये गेल्याचे ट्विट करून सांगितले आहे. आदित्यनाथ यांच्या कार्यालयातील अनेक बडे अधिकारी करोना संक्रमित झाल्याचे चाचणीतून स्पष्ट झाले आहे. त्यानंतर या अधिकाऱ्यांच्या संपर्कात आल्यामुळे योगीनी स्वतः विलगीकरणात जाण्याचा निर्णय घेतला आहे. अर्थात ते सर्व कार्यालयीन काम व्हर्च्युअली करणार आहेत.

मंगळवारी योगी आदित्यनाथ यांच्या कार्यालयातील मुख्य अपरसचिव एस.पी. गोयल, ओएसडी अभिषेक कौशिक यांच्यासह अनेक अधिकाऱ्यांची करोना टेस्ट पोझिटिव्ह आली असल्याचे योगींनी ट्विट मध्ये म्हटले आहे. योगींनी धार्मिक गुरूंबरोबर व्हिडीओ कॉन्फरन्सिंगने एक बैठक नुकतीच घेतली असून त्यात करोना विरुद्धची लढाई ही एकट्या पंतप्रधानांची जबाबदारी नाही तर आपण सर्वानी त्यांच्या नेतृत्वाखाली हही लढाई लढायची आहे असे सांगितले आणि नवरात्र, रमजान लक्षात घेऊन सर्व धर्मगुरुंनी भाविकांना करोना नियमावलीचे काटेखोर पालन करण्यासाठी आवाहन करावे असे निवेदन केले.

उत्तर प्रदेशात करोना प्रकोप वाढत चालला असून सलग आठव्या दिवशी रेकॉर्ड १८ हजाराहून अधिक केसेस आल्या आहेत. लखनौ येथे सर्वाधिक ५३०० तर प्रयागराज येथे १८०० नवे रुग्ण आढळले आहेत.