करोना लसीचा दुसरा डोस देशात कुठेही घेता येणार
करोना लसीचा पाहिला डोस एका ठिकाणी घेतला आहे पण दुसरा डोस त्याच ठिकाणी जाऊन घ्यावा लागणार का या प्रश्नांबाबत आणि लसीकरणाच्या अन्य शंकांबाबत आरोग्य मंत्रालयाने खुलासा केला आहे. त्यानुसार पहिला डोस कुठेही घेतला असला तरी त्याच ठिकाणी दुसरा डोस घेण्याची आवश्यकता नाही. देशभरात कुठेही दुसरा डोस घेता येईल. फक्त पहिल्यांदा ज्या कंपनीची लस घेतली, त्याच कंपनीचा दुसरा डोस घ्यावा लागणार आहे.
देशात करोना लसीकरण वेगाने सुरु असून आता ४५ वर्षांवरील सर्व नागरिकांना लसीकरण परवानगी दिली गेली आहे. कोट्यवधी नागरिकांना पहिला डोस मिळाला आहे तर लाखो लोकांना दुसरा डोस सुद्धा मिळाला आहे. करोनाचा प्रसार अतिवेगाने होऊ लागल्याने अनेक राज्ये लॉकडाऊनचा निर्णय घेण्याचा विचार करत आहेत. यामुळे घरापासून दूर येऊन कामकाज करणारे लाखो लोक आपापल्या घरी परतू लागले आहेत. अश्यावेळी दुसरा डोस कुठे घ्यायचा याची शंका अनेकांना भेडसावत होती. पहिला डोस कुठल्या लसीचा आहे त्याची नोंद लसीकरण केंद्रावरून पहिला डोस घेतल्यावर मिळालेल्या स्लीप मध्ये आहे. त्यानुसार ही लस कुठल्या केंद्रावर उपलब्ध आहे ते पाहून तेथे जाऊन दुसरा डोस घ्यावा लागणार आहे.
नागरिकांनी लसीचे दोन्ही डोस घेणे आवश्यक असून दोन्ही डोस घेतले तरच या लसीचा फायदा मिळणार आहे. कोवॅक्सिनचा पहिला डोस घेतल्यावर दुसरा डोस ४ ते ६ आठवडे आणि कोवीशिल्डचा पहिला डोस घेतल्यावर ४ ते ८ आठवड्यामध्ये दुसरा डोस घ्यायचा आहे. कोवीन किंवा आरोग्य अॅपवर त्यासाठी पुन्हा नोंदणी करावी लागणार आहे. तुम्ही पहिला डोस कुठल्या कंपनीचा घेतला आणि दुसरा डोस कुठल्या केंद्रावर उपलब्ध आहे तेथील वेळ या अॅपवरून मिळू शकणार आहे असाही खुलासा केला गेला आहे.