उत्तराखंडच्या मुख्यमंत्र्यांचा दावा; कोरोनाचा फैलाव गंगा मातेच्या कृपेमुळे होणार नाही


डेहराडून: कोरोनाचा संसर्ग झालेल्यांची संख्या संपूर्ण देशभरात दिवसेंदिवस वाढत चालली आहे. तर दुसरीकडे कुंभमेळ्याचे उत्तराखंडमधील हरिद्वार येथे आयोजन करण्यात आले आहे. हजारोंच्या संख्येने भाविकांनी या कुंभमेळ्यातील शाही स्नानासाठी हजेरी लावली असून, कुंभमेळ्यात सहभागी झालेल्या शेकडो भाविकांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती मिळाली आहे. उत्तराखंडचे मुख्यमंत्री तीरथ सिंह रावत यांनी या पार्श्वभूमीवर अजब दावा केला आहे. गंगा मातेच्या कृपेमुळे कोरोनाचा फैलाव होणार नाही, असे रावत यांनी म्हटले आहे.

पत्रकारांशी संवाद साधताना मुख्यमंत्री तीरथ सिंह रावत म्हणाले की गंगा मातेच्या कृपेमुळे कोरोनाचा फैलाव होणार नाही. कारण गंगा नदी अविरतपणे वाहत असते. गंगा मातेचे आशीर्वाद घेऊन कुंभमेळ्यातील शाही स्नानासाठी जावे, असा अजब दावा तीरथ सिंह रावत यांनी केला आहे. तसेच मरकजशी कुंभमेळ्याची तुलना करू नये. असे करणे चुकीचे असल्याचेही रावत यांनी स्पष्ट केले.