उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून गुढीपाडवा व मराठी नववर्ष तसेच रमजानच्या पवित्र महिन्याच्या शुभेच्छा


मुंबई : वसंतऋतुच्या आगमनासोबत सुरु होणारं मराठी नववर्ष आणि त्यानिमित्तानं साजरा होणारा गुढी पाडव्याचा सण सर्वांच्या जीवनात सुख, समृद्धी, आनंद, उत्तम आरोग्य घेऊन येवो. मनातील नवनिर्मितीच्या कल्पनांना चैत्रपालवीची संजीवनी मिळो. जीवनात यशाच्या उंच गुढ्या उभारण्याची स्वप्ने पूर्ण होवोत. यशाच्या त्या उंच गुढ्यांमध्ये एक गुढी ‘कोरोनामुक्ती’च्या विजयाचीही असो, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील जनतेला गुढी पाडवा आणि मराठी नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

मराठी संस्कृतीत अनन्यसाधारण महत्त्व असलेला गुढी पाडव्याचा सण सर्वांनी आनंदात, उत्साहात, कोरोनाप्रतिबंधक नियमांचे पालन करुन साजरा करावा, असे आवाहन उपमुख्यमंत्र्यांनी केले आहे.

राज्यातील जनतेला गुढीपाडवा आणि मराठी नववर्षाच्या शुभेच्छा देताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, भारतीय आणि मराठी संस्कृतीत गुढी पाडव्याच्या सणाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. निसर्गाशी नाते सांगणारा हा सण आहे. चैत्र महिन्यापासून वसंत ऋतुचं आगमन होते. झाडांची सुकी पाने गळून पडतात. नवीन पालवी फुटते. निसर्गातील या आशादायी बदलांचे उत्साहानं स्वागत करण्याचा हा सण आहे.

कोरोनामुळे यंदाचा गुढीपाडवा सामुहिकपणे साजरा करता येत नसला तरी, कोरोनाप्रतिबंधक नियमांचं पालन करुन यंदा गुढीपाडवा साधेपणाने साजरा करुया. कोरोनाला हरवल्यानंतर पुढच्या वर्षीचा गुढीपाडवा सर्वांनी एकत्र मिळून साजरा करण्याचा निर्धार करुया, अशा शब्दात उपमुख्यमंत्र्यांनी राज्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत.

त्याचबरोबर राज्यातील जनतेला पवित्र रमजान महिन्याच्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. मुस्लिम बांधवांचा पवित्र रमजान महिना समाजात आनंद, उत्साह, बंधुत्वाची भावना घेऊन येतो. परस्परांशी प्रेमाने, संयमाने, आपुलकीने वागण्याची शिकवण देतो. रमजान महिन्यातील प्रार्थना आणि उपवास जीवनाकडे सकारात्मक बघण्याची दृष्टी देतात. गोरगरिबांच्या, मानवतेच्या कल्याणासाठी काम करण्याची, त्यागाची प्रेरणा देणारा हा महिना आहे. यंदाचा रमजान महिना सर्वांच्या जीवनात शांती, सुख, समृद्धी, भरभराट, आनंद, उत्तम आरोग्य घेऊन येवो, अशा शब्दात उपमुख्यमंत्र्यांनी सर्वांना पवित्र रमजानच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

उपमुख्यमंत्री शुभेच्छा संदेशात म्हणतात की, रमजानचा महिना मुस्लिम बांधवांसाठी स्वयंशिस्त, संयम शिकवतो. विनाशकारी विचारांपासून, कृतींपासून दूर राहण्यास सांगतो. यंदा कोरोनाच्या संकटाशी लढताना सर्वांनी संयम, जबाबदारीने वागण्याची गरज आहे. त्यासाठी तरावीहची नमाज, रोजा सहेरी, रोजा इफ्तारसारखे कार्यक्रम घरीच साजरे करावेत. घराबाहेर पडू नये, रस्त्यावर गर्दी करु नये, मशिदीत, रस्त्यावर, मैदानात एकत्र येऊ नये, गळाभेटी, भेटीगाठी घेण्यापेक्षा नातेवाईक आणि मित्रमंडळींना फोनवर शुभेच्छा द्याव्यात. ‘कोरोना’चे संकट दूर होण्यासाठी प्रार्थना, सहकार्य करावे. कोरोना प्रतिबंधक सूचनांचे पालन करुन आपले कर्तव्य पार पाडावे, असे आवाहन उपमुख्यमंत्र्यांनी आपल्या संदेशात केले आहे.