शरद पवारांच्या पावसातील सभेवरुन देवेंद्र फडणवीसांचा टोला


पंढरपूर – लोकसभा पोटनिवडणुकीच्या दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी साताऱ्यात भर पावसात घेतलेली सभा राज्याच्या राजकारणात आजही चर्चेचा विषय आहे. साताऱ्यातील चित्र शरद पवारांनी घेतलेल्या त्या सभेमुळे बदलले आणि उदयनराजेंना पराभवाचा सामना करावा लागला. दरम्यान ही सभा पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. याचे कारण म्हणजे या सभेवरुन विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी टोला लगावला आहे.


देवेंद्र फडणवीस सोमवारी पंढरपूर विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीसाठी भाजप आणि महायुतीचे उमेदवार समाधान आवताडे यांच्या प्रचारासाठी पंढरपुरात होते. त्यांनी यावेळी एकूण सहा सभा घेतल्या. त्यांनी सभेत बोलताना महाविकास आघाडी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. तसेच शरद पवारांच्या सभेचा उल्लेख करत आपल्याला आपल्याला निवडणूक जिंकण्यासाठी पावसात सभा घ्यावी लागत नसल्याचे म्हणत टोला लगावला.

आता पावसात सभा घेण्याची तुमची वेळ आहे, असे मला खासदार निंबाळकर यांनी सांगितले. आपल्याला निवडणूक जिंकण्यासाठी पावसात सभा घ्यावी लागत नाही. पण एक गोष्ट निश्चित सांगतो ही निवडणूक एका मतदारसंघाची असली तरी महाराष्ट्रात ही निवडणूक एक नवीन विचार आणि मार्ग घेऊन येणार असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.