दोन तीन लसींचे मिश्रण करून चीन बनवतेय नवी करोना लस

चीन करोना लस अधिक प्रभावी बनावी यासाठी दोन किंवा अधिक करोना लसी एकत्र करून नवीन लस बनविण्याच्या प्रयत्नात आहे. चीन औषध क्षेत्रातील सर्वोच्च संस्था सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शन यासाठी वेगाने काम करत आहे. या संस्थेचे संचालक गाओ फु यांनी चेंगडू येथील पत्रकार परिषदेत या संदर्भात माहिती दिल्याचे वृत्त रॉयटरने दिले आहे.

चीनी कंपनी सायनोवॅक्स करोना लसीचे उत्पादन वेगाने करत आहे मात्र ही लस सर्वात चांगली मानली जात असली तरी तिचा सक्सेस रेट ६० टक्क्याच्या जवळपास आहे. काही ठिकाणी तर ही लस ४९ टक्केच प्रभावी ठरली आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या मानकानुसार ही टक्केवारी खुपच कमी आहे. गाओ फु यांच्या म्हणण्यानुसार चीन मध्ये सध्या चार प्रकारच्या करोना लसी आहेत. पण करोना प्रतिबंधासाठी त्या अचूक म्हणता येत नाहीत. त्यामुळे सरकार चिंतेत आहे.

नवी लस जास्त प्रभावी, दीर्घकाळ प्रतिकार क्षमता देणारी व्हावी यासाठी दोन किंवा त्यापेक्षा अधिक लसी एकत्र करून नवी लस बनविण्याचा प्रयत्न हा त्याचाच एक भाग असल्याचे सांगून गाओ फु म्हणाले ही नवी लस वाहतूक आणि साठवण या दृष्टीने सुद्धा सहज सुलभ असेल. या वर्षअखेर ती बाजारात आणली जाईल. सध्या अश्या लसीचे ३०० डोस बनविले जात आहे. करोना विरुद्धची लढाई ही माणसाना वाचविण्याची लढाई आहे. तेथे मागे हटून चालणार नाही असेही फु म्हणाले.